पुणे, 09 डिसेंबर : पुण्यातील (Pune) कोथरुड परिसरात (kothrud) आज सकाळी चक्क एक रानगवा (gaur) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अचानक गव्याचे दर्शन झाल्याने अनेकांची धावपळ उडाली होती. या रानगव्याला आता बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी गव्याला घाबरून पळ काढला. गव्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली आहे. तब्बल दहा फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळ्या जागेमध्ये शिरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
रानगवा असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभाग आणि पुणे महापालिकेला कळवली. वन विभागाचे अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रानगवा जंगलात राहणारा प्राणी असल्याने तो कोथरूडमध्ये कसा आला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या गव्याने 2 लोखंडी गेट तोडले आहेत, या गव्यांला ताब्यात घेण्याच काम वनविभाग करत आहे.