BREAKING : 1 जानेवारीला पुणे-नगर महामार्ग राहणार बंद

BREAKING : 1 जानेवारीला पुणे-नगर महामार्ग राहणार बंद

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे...

  • Share this:

                         

पुणे, 25 डिसेंबर : कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वत्र खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहे. अशात गर्दी टाळण्यासाठी 1 जानेवारी रोजी  कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहे.

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांनी यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करावे, असं आवाहन आधीच प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता 1 जानेवारी रोजी पुणे - नगर महामार्ग  बंद राहणार आहे.

तसंच, या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे,  असं जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

एल्गार परिषदेला परवानगी नाही

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आयोजक काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन  

दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Published by: sachin Salve
First published: December 25, 2020, 8:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या