पुणे, 29 जुलै : आज येणार, उद्या येणार अशी चर्चा सुरु असलेली आणि गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांचं स्वप्न बनून राहिलेली मेट्रो (Pune Metro) अखेर शुक्रवारी (Friday) धावणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्विट करून याची घोषणा केली आहे. यामुळे पुणेकरांचं मेट्रोचं अनेक वर्षांचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.
सकाळचा मुहूर्त
शुक्रवारी सकाळी 7 वाजता पुणे मेट्रोची ट्रायल घेतली जाणार आहे. सकाळी 7 वाजता कोथरूड डेपोतून मेट्रो ट्रायलसाठी बाहेर पडेल आणि आयडियल कॉलनीपर्यंत ती जाईल, अशी माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
संकल्पातून सिद्धीकडे; पुणे मेट्रोची उद्या ट्रायल ! पुणेकरांनी पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न उद्या पूर्ण होतंय. उद्या स. ७ वा कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनी या टप्प्याची चाचणी होतेय. कित्येक वर्षे कागदावर धावणारी मेट्रो प्रत्यक्षात धावताना पाहण्याचं पुणेकर म्हणून असलेलं दुसरं सुख ते काय?
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 29, 2021
त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी या चाचणीसाठी हजर राहणार आहेत.
वनाज आणि गरवारे महाविद्यालयादरम्यान मेट्रो मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. मेट्रो स्टेशनचं कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. तर पिंपरी-चिंचवड-कासारवाडी या भागातील मेट्रो ट्रॅकचं कामदेखील पूर्ण झालं आहे. तर दिवाणी न्यायालयापासून स्वारगेटपर्यंत सुरु असणारं भुयारी मार्गाचं काम अद्यापही सुरू आहे.
हे वाचा -बापरे! मुंबईतील रस्त्यांसाठी BMC कडून 21,000 कोटींहून अधिक खर्च, खड्डे जैसे थे
निवडणुकीपूर्वी मेट्रो सुरु कऱण्याचे प्रयत्न
या वर्षाअखेर किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी वनाज-गरवारे कॉलेज आणि पीसीएमसी-कासारवाडी हे दोन टप्पे कार्यान्वित करण्याचा प्रसासनाचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. नागपूर मेट्रोचं काम वेगानं होऊन ती मेट्रो धावू लागली तरी पुण्यातील मेट्रो मात्र अद्यापही सुरु झालेली नाही. पुणे मेट्रोचं काम इतर शहरांच्या तुलनेत धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोप वारंवार झाला आहे. मात्र आता शुक्रवारी ही मेट्रो धावताना पुणेकरांना दिसणार आहे. प्रत्यक्षात त्यातून प्रवास करण्यासाठी मात्र अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.