पुणे, 30 जून: पुण्याचे (Pune) पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठकीला न बोलावल्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) कमालीचे संतापले आहे. आज पुन्हा एकदा मोहोळ यांनी बैठकीच्या दोन तासांपूर्वी पत्र पाठवले असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या शहरध्यक्षांवर जोरदार प्रहार केला आहे
मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून बैठकीची निमंत्रण पत्रिका समोर आणली आहे. राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील 'अडगळी'चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. म्हणूनच वाट्टेल ते बोलायचं, चर्चेत येण्याचा प्रयत्न करताना लोकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करायची, ही त्यांची नेहमीची वृत्ती पुणेकरांनी चांगलीच ओळखली. म्हणूनच की काय 2017 साली ते महापौर असताना त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी झिडकावून लावले, अशी टीका मोहोळ यांनी केली.
राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी !
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील 'अडगळी'चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. pic.twitter.com/RhsCbfvHcH — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 30, 2021
तसंच, 'मूळ मुद्दा असा की, मंत्रालयात पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीला महापौर म्हणून महापौर कार्यालयाला निमंत्रण बैठकीआधी दोन तास Whats App वर मिळाले. शहराच्या महत्त्वाचा विषयावर नियोजित बैठक, प्रश्न सर्व महापालिकेशी निगडित आणि निमंत्रण कशावर... तर Whats App वर. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून २५ जूनला जे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं त्यात महापौर म्हणून बैठकीला अपेक्षित आहेत, असा कुठेही उल्लेख नव्हता. याचाच अर्थ 'महापौर' म्हणून मला या बैठकीचे निमंत्रण नव्हते, असंही मोहोळ म्हणाले.
दरम्यानच्या काळात प्रिंट मीडिया आणि बैठकीच्या दिवशी सकाळी 'महापौरांना मंत्रालयातील बैठकीला डावललं' अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियात झळकल्या. त्यानंतर लगेचच महापौर कार्यालयाला एक दिवस आधीच्या तारखेचे (28 जून) पत्र बैठकीच्या दोन तास आधी (29 जून, स. 11 वाजता) पत्र #WA वर मिळाले, असा दावाही मोहोळ यांनी केला.
फक्त मिसळा दोनच पदार्थ; तुमचा साधा चहाही होईल इम्युनिटी बुस्टर
'जेव्हा ते पत्र मिळाले तेव्हा मी मुठा या मुळशी तालुक्यातील गावी माझ्या आई-वडिलांसमवेत होतो. बैठकीला आपल्याला निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच मी मुठा गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहुन फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची? बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?' असा सवालही मोहोळ यांनी विचारला.
'महापौर म्हणून राज्य सरकारच्या बैठकीला शहराच्या हिताचा विचार करुन गैरहजर राहिलेलो नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीपजी वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बैठकांना माझी उपस्थिती होती. पुण्यातील दर शुक्रवारी होणाऱ्या अजितदादांच्या सर्व बैठकांना हजेरी लावून समन्वय साधला आहे. असं असताना पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बैठक आपण का टाळू? तरीही आपल्याला डावलून का होईना शहराच्या विकासासंदर्भात बैठक होतेय, याचं आपण स्वागतच केलं. पुणे शहरासाठी कोण झटतं? कोण काम करतं? संकटकाळात कोण घरात आणि कोण रस्त्यावर होतं? याची जाण पुणेकरांना नक्कीच आहे. विद्यमान शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी २०१७ ला खड्यासारखं बाजूला केलं. त्यामुळे ही बनवेगिरी राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी आता तरी थांबवावी, अन्यथा पुणेकर आपल्याला येत्या महापालिका निवडणुकीत तोंडी लावायलाही ठेवणार नाहीत' अशी टीकाही मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर केली.
काय म्हणाले होते जगताप?
'मुरलीधर मोहोळ यांच्या आरोपाला उत्तर देताना ते बालिशपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. आजची बैठक कामांच्या संदर्भामध्ये लावली. त्या दोन्ही कामांची पत्र राष्ट्रवादीचे संबंधित आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांनी अजित दादा यांना लिहिलेल्या या पत्राची दखल घेऊन या दोघांनाही बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात महापौर हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत असल्याची माहिती त्यांच्याच कार्यालयाने दिली होती. केवळ आपल्याला मुंबईला जाता आलं नाही म्हणून महापौर नाराज आहेत, आणखी काही हा शोधाचा विषय आहे. महापौरांनी हा असला बालिशपणा सोडून द्यावा, असा सल्लाही प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Maharashtra, NCP, Pune