जुन्नर, 1 मे: राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वच राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील कुरवंडी गावातील (Kurvandi Village) ग्रामस्थांनी चोंभाबाई माता देवीची (Chombhabai Mata Devi) प्राणप्रतिष्ठापना आणि कलशपूजन सोहळा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता ग्रामस्थांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाटी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदीचे आदेश काढले होते. असे असताना आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावात चोंभाबाई माता प्रतिष्ठापना आणि कलशपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. बुधवारी हा कार्यक्रम पार पडला होता.
वाचा: शाही लग्न सुरू होण्याआधीच पोलिसांची धाड! 1 लाख 14 हजारांचा दंड भरताना आले नाकीनऊ
गर्दी करुन कोविड काळातील नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. 7 आयोजकांसह कार्यक्रमात सहभागी झालेल्या 80 ते 90 महिला आणि पुरुषांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 सह साथीचे रोग कायदा कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने नियमावली तयार केली असून केवळ अत्यावश्यक सेवा सुविधाच सुरू आहेत. धार्मिक, सार्वजनिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचं पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra, Pune