पुणे, 8 जानेवारी : मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ, आणि व्यवस्थापनतज्ज्ञ डॉक्टर प्र.चिं. शेजवलकर यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. प्राचार्य असलेले प्र.चिं. शेजवलकर हे BMCC मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचेही प्रोफेसर होते.
शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुशाफिरी करत. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर सुमारे 60 वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आधी उपाध्यक्ष आणि 2012 साली अध्यक्ष झाले. त्यांच्या हाताखाली 82 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे.
काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद त्यांनी खंडपणे भूषविले. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालकही होते.
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी शेजवलकर नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करत. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो, उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. सुमारे 30 पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली. प्रमोद जोगदेव यांच्या ’सकारात्मक विचारासाठी’ या पुस्तकाला प्र.चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना होती. त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. सुमारे 50 वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे.
प्र.चिं. शेजवलकर यांनी लिहिलेली पुस्तके :
आठवणीतील माणसं
उद्योजकांची कर्तृत्वगाथा
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी
नव्या युगाची स्पंदने (संपादित सामाजिक लेख) (गं.बा.सरदार यांचे निवडक लेख)
प्रसाद प्रभाकर
भारताचा आर्थिक विकास
मधुपरीक्षा
महाराष्ट्राचा आर्थिक विकास
यशस्वी जीवनाचे रहस्य
यशस्वी सुखी जीवन
यशोगाथा (चर्चा पान पहावे)
विक्रय व्यवसाय आणि जाहिरात कला (सहलेखक मो.स. गोसावी)
व्यापार संघटन
सहकारी संस्थांची व्यवस्था व चिटणिसांची कामे
स्वगत
स्वातंत्र्याची 25 वर्षे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.