पुणे, 11 जुलै : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात 13 जुलैपासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र काही घटकांकडून विरोध होत आहे. पुणे व्यापारी संघानंतर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
'मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,' अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
व्यापारी संघांचा विरोध
पुणे शहर व्यापारी संघाचा लॉकडाऊनला विरोध केला आहे. पुणे शहरात परत लॉकडाऊन झाला तर उद्रेक होईल, असंही व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद्र राका यांनी म्हटलं आहे. सातही दिवस दुकाने उघडी ठेवावीत. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी वेळ असावी, अशा मागण्या व्यापारी संघानं केल्या आहेत. व्यापारी संघात सुमारे 40 हजार दुकानदार सदस्य आहेत. आता व्यापारी संघाच्या विरोधानंतर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणी महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देश पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहर तसेच लगतच्या गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी वेळीच कडक उपाययोजना कराव्यात तसेच ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.