मुंबई, 3 फेब्रुवारी : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. नीलम गोऱ्हे यांच्या घरी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नाना पटोले, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई या नेत्यांमध्ये दोन्ही पोटनिवडणुकींवरून चर्चा झाली. तिन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून अंतिम निर्णय उद्या होईल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
'कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आढावा घेतला सकारात्मक चर्चा झाली. आज संध्याकाळी शेकाप, सपा तसंच इतर मित्र पक्षांशी चर्चा करू. अंतिम निर्णय उद्या घोषित करू. महाविकासआघाडी एकत्र लढणार आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकासआघाडीचा विजय झाला, याचा अर्थ महाराष्ट्रातलं चित्र लक्षात येतं. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. चिंचवडबद्दल पक्षात मतभेद नाही. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेऊ,' अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र; ठाकरेंना म्हणाला, "हे ही दिवस निघून जातील, पुढचा काळ..."
'या जागा आम्ही महाविकासआघाडी म्हणून लढवू. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आमच्याकडे आवाहन आलं नाही. कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर इथे लोकांची भूमिका असताना निवडणूक झाली. मुंबईत नाईलाज म्हणून निवडणूक बिनविरोध केली. गेल्या काही वर्षात संकेत पाळले नाहीत,' असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
'शिवसेना कुठे जाते यापेक्षा महाविकासआघाडी जिंकणं हे प्राधान्य आहे. प्रत्येक पक्षाला जागा हवी असते. दोन्ही पोटनिवडणुका एकत्र काढायच्या आहेत. अंतिम निर्णय उद्या होईल,' असं शिवेसना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.