पुणे, 13 जुलै : कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण राज्यासह देशावर मोठं संकट ओढावलं आहे. या व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासन, प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र काही हौशी लोक हे सर्व नियम-अटी बाजूला सारताना पाहायला मिळतात. हेच नियम तोडणं पुणे जिल्ह्यातील काही लोकांना महागात पडलं आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धालेवाडी इथं शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यात आला. या लग्नसोहळ्याला तब्बल 400 च्या आसपास लोक उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात एक कोरोनाबाधित पाहुणा हजर झाल्याने नवरा-नवरीसह अनेकांना कोरोनाची लागण झाली.
तसंच लग्नसोहळ्यानंतर रात्री वरात काढण्यात आली. तिथं अनेक लोक उपस्थित होते. त्यामुळे अखेर या लग्न सोहळ्याप्रकरणी मंगल कार्यालय मालक, वर व वधू पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
लॉकडाऊन असताना 29 जूनला हा विवाह सोहळा जुन्नर जवळील एका मंगल कार्यालयात पार पडला होता. या सोहळ्याला जुन्नरचे आमदार, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष, यासोबत परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील 400 पेक्षा जास्त मंडळी उपस्थित होते. तालुक्यातील धालेवाडी येथील वधू आणि हिवरे बुद्रुक येथील वर यांचे या सोहळ्यात लग्न होते.
मुंबईचा एक कोरोना पॉझिटिव्ह पाहुणा लग्न सोहळ्यात उपस्थित राहिला आणि त्याने विवाह सोहळ्यातील नवरा-नवरीसह अनेकांना बाधित केले. लग्नानंतर रात्री वरात झाली. त्यात सुद्धा मोठी गर्दी होती. नवरा-नवरी कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. येथील लग्न सोहळ्यासाठी आलेला पाहुणे,कार्यमालक,वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा नवरी कोरोनाबाधित निघल्याने हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.