पुणे 27 जानेवारी : घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमुळे अपघात झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. निष्काळजीपणामुळे अशा घडना घडत असल्याचं आढळून आलंय. अशीच एक घटना पुण्यात घडलीय. गॅस गळती झाल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात एका 6 महिन्यांच्या चिमुरडीचा अंत झाला. यात तिचे आई-वडीलही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुण्यातल्या संभाजी नगरातील खराडी इथल्या घरात ही घटना घडलीय. शंकर भवाळे आणि आशा भवाळे हे कुटुंब राहातं. त्यांना 6 महिन्यांची स्वराली ही मुलगी आहे. रात्री सर्व कुटुंबं झोपलेलं असताना घरात गॅसची गळती झाली होती. आशा पहाटे झोपेतून उठल्या आणि स्वयंपाकघरात आल्या. आल्यावर त्यांनी लाईट सुरू करण्यासाठी बटन दाबलं आणि अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की त्यात घराचं छप्पर उडून गेलं.
या अपघातात घरात झोपलेल्या स्वराली या 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला तर आई-वडीलही जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. LPG गॅसची गळती झाली तर ते स्फोटक होतं. सिलेंडरमध्ये असलेला गॅस हा धोकादायक असतो. त्यामुळे रात्री झोपताना किंवा गावाला जाताना सिलेंडर नीट बंद केलं किंवा नाही याची खात्री केली पाहिजे अशा सूचना कायम देण्यात येतात.
त्याचबरोबर बंद घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात आधी दारं खिडक्या उघड्या केल्या पाहिजे म्हणजे घरातली हवा बाहेर जाते. त्यामुळे धोका टळतो. मात्र अनेकदा कामाच्या घाईत या सुरक्षा उपयांची अंमलबजावणी नीट केली जात नाही.