200 कोटींची भिंत कागदावरच; पुणेकरांनी पुन्हा अनुभवला रात्रीचा जीवघेणा थरार

200 कोटींची भिंत कागदावरच; पुणेकरांनी पुन्हा अनुभवला रात्रीचा जीवघेणा थरार

काल शुक्रवारी (11 सप्टेंबर) झालेल्या पावसाने पुणेकरांची काय दैना झाली पाहा. कात्रज कोंढवा रस्ता, कात्रज तलाव या परिसरामध्ये प्रचंड पाणी भरलं होतं. ही निसर्गाची अवकृपा म्हणायची की प्रशासकीय निष्क्रियता?

  • Share this:

पुणे, 12 सप्टेंबर : पुण्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये बेभान प्रलयकारी पाऊस पडला होता. अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यातले निम्मे रस्ते पाण्याखाली गेले होते. किमान दोन डझन माणसांना जीव गमवावा लागला होता. काल शुक्रवारी (11 सप्टेंबर) झालेल्या पावसाने पुन्हा एकदा ती काळरात्र आठवली. कालच्या पावसानंतर कात्रज कोंढवा रस्ता, कात्रज तलाव या परिसरामध्ये प्रचंड पाणी भरलं होतं. दोनशे कोटी रुपये खर्चून तलावाजवळ रिटेनिंग वॉल उभ्या करू, असं सांगूनही महापालिकेकडून अद्याप काहीही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आणखी एखादा जोराचा पाऊस आला तर परिस्थिती काय होऊ शकते हे पुन्हा एकदा रात्री पुणेकरांनी अनुभवलं.

काल झालेल्या पावसात शेवाळेवाडीमध्ये एक लहान मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मात्र आसपासच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे या मुलाला तातडीने पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण स्थिती सध्या गंभीर आहे. आजही जोरदार पाऊस झाला तर पुन्हा अशीच परिस्थिती येऊ शकते. गेल्या वर्षी कात्रज तलावातून पाणी न सोडल्यामुळे तो भरून वाहू लागला. भर पावसात त्यामुळे आंबिल ओढ्याला पूर आला आणि आसपासच्या परिसराची वाताहत झाली होती.  यंदाच्या वर्षीसुद्धा तशीच परिस्थिती उद्भवू शकते आणि याला महापालिकेचा कारभार जबाबदार आहे, असा आरोप मनसेचे महापालिकेतले गटनेते वसंत मोरे यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या जोरदार पावसाने ओढ्याला पूर आला. त्यामुळे संपूर्ण कात्रज तलाव परिसर आणि ओढ्यालगत रिटेन्शन वॉल बांधणार, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण 200 कोटींचा हा आराखडा वर्षभरानंतरही अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही.

काय घडलं होतं गेल्या सप्टेंबरमध्ये?

गेल्या वर्षी 25 सप्टेंबरच्या रात्री पुण्यात फक्त 4 तासांत असा काही बेभान पाऊस झाला की, असा पाऊस उभ्या जन्मात पाहिला नाही, असं अजूनही पुणेकर सांगतात. या तुफानी पावसाने रस्त्यांचे नाले झाले. या पुरात किमान दोन डझन लोकांचे प्राण गेले. हजारो वाहनं पुरात वाहून गेली. पुढचे कित्येत दिवस घरांमधून, सोसायट्यांमधून आणि झोपड्यांमधून चिखल-गाळ उपसायचं काम सुरू होतं. NDRF च्या जवानांनी अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं म्हणून कित्येक जीव वाचले. गंमत म्हणजे पुण्यातल्या मुख्य नद्यांना नव्हे, तर नाले, ओढे आणि तलावांना पूर आल्याने जवळपास 60 टक्के शहराला जबर फटका बसला.

सप्टेंबरमध्ये संध्याकाळनंतर झालेल्या या प्रचंड पावसानं कात्रज तलाव भरून वाहू लागला आणि त्या दबावाने आंबिल ओढ्याची भिंत फुटली. हा ओढा शहराच्या मध्यभागातून एरवी बेमालूमपणे वाहात असतो. इथे एवढा मोठा, कात्रजपासून मुठेपर्यंतचा ओढा आहे याची जाणीवही नव्हती. ती झाली 26 सप्टेंबर 2019 नंतर. अंबिल ओढ्यालगतच्या झोपडपट्टीतच नाही तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. अवघ्या रात्रभरात हाहाकार झाला होता.

कुठल्या भागांना आहे flash flood चा धोका?

गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पावसाने शहरातले कात्रज, बिबवेवाडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकार नगर, टांगेवाला कॉलनी, कोंढवा, फातिमा नगर, पर्वती पायथा, वानवडी, दांडेकर पूल, म्हात्रे पुलाचा परिसर, वडगाव धायरी, एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रोड, गणेश पेठ नाल्याजवळचा भाग असे अनेक भाग या पुराच्या तडाख्यात सापडले होते. आतासुद्धा कधी असा कमी वेळात तुफान पाऊस झाला, तर या ओढ्याकाढच्या आणि नाल्यांकाठच्या भागांना सर्वाधिक धोका आहे. नदीलगत राहणाऱ्यांपेक्षा ओढ्यालगत राहणं धोक्याचं झालं आहे.

काय आहे IMD चा हवामान अंदाज?

गेले काही दिवस संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. वादळी वाऱ्यांसह असा पाऊस पुढचे काही दिवसही पडत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवार, रविवार शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडतो, असा इशारा IMD ने दिला आहे. यलो अलर्ट म्हणजे सावध राहा वेधशाळेने जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांनो पुढचे काही दिवस काळजी घ्या. September Rains चे दिवस आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 12, 2020, 4:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या