मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

SPECIAL REPORT : भयंकर! कोरोना रुग्णांमध्ये पुणे देशात अव्वल, 'या' चुकीमुळे वाढला प्रादुर्भाव?

SPECIAL REPORT : भयंकर! कोरोना रुग्णांमध्ये पुणे देशात अव्वल, 'या' चुकीमुळे वाढला प्रादुर्भाव?

पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाही पुणेकरांनी मागे टाकलं आहे.

पुणे, 8 सप्टेंबर : पुणे जिल्ह्याने कोरोना रूग्णसंख्येचा 2 लाखांचा टप्पा पार केल्याने पुणेकर आता कोरोनाच्या साथीत देशात नंबर झाले आहेत. अर्थात ही काही भुषणावह बाब नाही. अगदी मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाही पुणेकरांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे पुणेकर नेमके चुकले कुठे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

देशात पहिला रूग्ण हा खरंतर केरळ राज्यात सापडला. महिन्याभराने म्हणजेच 9 मार्चला राज्यातला पहिला कोरोना रुग्ण हा पुण्यातच आढळून आला. त्यानंतर 22 मार्चपासूनच पुण्यात लॉकडाऊनही सुरू झालं ते अगदी मे अखेरपर्यंत सुरू होतं. पण आजमितीला सहा महिन्यांचा आढावा घेतला तर कोरोनाच्या बाबतीत हाच पुणे जिल्हा देशात नंबर वन झाला आहे. गेल्या सोमवारीच पुणे जिल्ह्याने 2 लाखांचा तर पुणे शहराने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे.

कोरोनातही पुणे देशात अव्वल

शहर कोरोना रूग्ण

दिल्ली 1.93 लाख

मुंबई 1.57 लाख

पुणे जिल्हा 2.03 लाख

पुणे शहर 1 लाख

मुंबई आणि दिल्लीचा विचार केला तर या दोन्ही महानगरांची लोकसंख्या ही 1 कोटींच्या वर आहे तर पुणे शहराची लोकसंख्या ही 50 लाखांच्या आत आहे. पण तरीही पुणे जिल्हा आणि शहर हे कोरोनाच्या बाबतीत देशात अव्वल झालं आहे. याचा उघड अर्थ असा आहे की प्रशासन कोरोनाच्या साथीवर नियंत्रण राखू न शकल्यानेच पुण्यात कोरोनाचा हा असा उद्रेक झाला आहे. त्यावर प्रशासनाकडून नेहमीसारखाच सर्वाधिक टेस्टिंग रेटचा मुद्दा पुढे केला जातो आणि ते काही प्रमाणात खरं देखील आहे. कारण पुणे जिल्ह्यात तब्बल साडे आठ लाख चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी पाच लाख चाचण्या या एकट्या पुणे शहरातील आहेत.

सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्यामुळेच पुणे जिल्हा आज कोरोनाच्या बाबतीत देशात सर्वात नंबर वन झाला असला तरी दोन लाखाच्या वर कोरोना रूग्ण सापडणं ही काही भूषणावह बाब नाही. कारण याचाच दुसरा अर्थ असा होतो की पुणे प्रशासन अजूनही कोरोनावर नियंत्रण आणू शकलेलं नाही. हे ढळढळतीत सत्य आहे. त्यातही वाढीव अॅक्टिव्ह रूग्णसंख्या आणि वाढते मृत्य नेमकं कसे आटोक्यात आणायचे हे अजूनही कोणालाही उमजलेलं नाही.

नेमकी कुठे झाली चूक?

मार्चमध्येच पुण्यात कोरोना रुग्ण आढळू लागल्यावर पुढे 22 मार्चला पहिलं लॉकडॉऊनही पुण्यातच झालं. पण त्यानंतरच्या काळात नव्याने आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होणं अपेक्षित होतं. त्यानुसार मग ससून हॉस्पिटल आवारातील गेली 9 वर्षे धुळखात पडलेली 11 मजली इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय झाला, पण महिनाभऱ्यात या कामात कोणतीच प्रगती दिसली नाही.

अशातच ससूनमधील मृत्यूचं प्रमाण वाढू लागलं. हाच मुद्दा राजकारण्यांनी उचलून धरत ससूनचे तत्कालीन डीन डॉ. अजय चंदनवाले यांना जबाबदार धरलं. आघाडी सरकारनेही मग लागलीच त्यांची बदली करून टाकली. सरतेशेवटी मग तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्वतः लक्ष घातल्याने ससूनची 11 मजली इमारत कोविड आयसीयू रूग्णालय म्हणून सज्ज झाली.

पालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली!

पुण्यात लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाचा पुन्हा पादुर्भाव वाढू लागल्याने जुलैमध्ये पुन्हा लॉकडाऊन 2चा आग्रह वाढू लागला. पण तत्कालीन पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यापुढे कोरोनासोबतच जगण्याची भूमिका लावून धरल्याने आघाडी सरकारने त्यांचीही तडकाफडकी बदली करून टाकली. त्यावरून भाजप आणि आघाडीमध्ये बरंच राजकारणही रंगलं, पण पुण्यातलं हेच लॉकडाऊन उठवण्यावरून त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

यांच्यातच मतभेद होते. हे स्वतः अजित पवारांनीच नुकतंच जाहीरपणे कबुल केलं आहे.

पुढे पुण्यातली जम्बो रूग्णालयाच्या निधीवरूनही भाजप आणि आघाडीमध्ये असंच राजकारण रंगलं. पण पालिकेलं 75 कोटी देण्याचे मान्य केल्यानंतर हा वाद मिटला. अवघ्या 18 दिवसात हे जम्बो रुग्णालय उभारण्याचं श्रेय आघाडी सरकारने घेतलं खरं...पण त्यातला फोलपणा पहिल्या आठवड्यात चव्हाट्यावर आला. अशातच पांडुरंग रायकर या युवा पत्रकाराला तिथं उपचाराविना आपला प्राण सोडावा लागला. तेव्हा कुठे सगळ्यांचेच डोळे खाडकन उघडले आणि प्रशासन पुन्हा कामाला लागलं. पण तोपर्यंत 42 रुग्णांचे जीव गमावले होते. नातेवाईकांची प्रचंड चिडचिड होत होती.

व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन बेडविना रूग्णांचे बळी जाण्याची पुण्यातही ही पहिलीच घटना नव्हती. मध्यंतरीही एका रुग्णाला बेड मिळाला नाही म्हणून अलका चौकातच त्याच्या नातेवाईकांना आंदोलन करावं लागलं होतं.

पुढे जशजशी रूग्णसंख्या वाढू लागली तशतशं ट्रँकिंग आणि ट्रेसिंगचं काम मागे पडू लागलं आणि त्यातूनच लक्षण नसलेल्या अर्थात कॅरिअर रूग्णांकडून झपाट्याने कोरोनाचा फैलाव वाढू लागला आणि परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली. अशातच पुण्याबाहेरचे गंभीर रुग्ण देखील पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागल्याने ऑक्सीजन बेड्स कमी पडू लागले. व्हेंटिलेटर बेड्सचा कुणालाच ताळमेळ लागत नव्हता. ऑनलाईन डॅशबोर्ड देखील अपडेट होत नसल्याने केवळ उपचाराअभावी शेकडो रूग्णांचे बळी जाऊ लागले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात साडे चार हजारांच्यावर कोरोना रूग्णांचे मृत्यू झाले आहेत.

पुण्यात अॅक्टिव्ह रूग्णसंख्याही पुन्हा वाढू लागली आहे. पण प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मात्र ब्लेमगेममध्येच धन्यता मानताना दिसत आहेत. या सगळ्याचा परिपाक व्हायचा तोच झाला. पुणे जिल्हा कोरोना फैलावात देशात नंबर वन बनला.

पुण्यात प्रारंभी फक्त पेठा आणि झोपडपट्ट्यांपुरता मर्यादीत असलेला कोरोनाचा पार्दुभाव आता निवासी सोसायट्या आणि उपनगरांमधूनही प्रचंड वाढू लागला आहे. सिरो सर्व्र्हेमध्ये तर झोपडपट्ट्यांमधील लोकांमध्ये अँटीबॉडींचं प्रमाण हे तब्बल 65 टक्क्यांपर्यंत आढळून आलं आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधून हेच प्रमाण 45 टक्के आहे.

उच्चभू सोसायट्यांमध्येही 35 टक्क्यांपर्यंत अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. याचाच अर्थ सध्या कोरोना संख्येपेक्षाही पुण्यात ही कोरोनाची साथ कितीतरी जास्त पटीने पसरल्याची भीती व्यक्त होत आहे. आताही शहरांच्या उच्चभ्रू भागात आणि उपनगरांमध्ये सर्वाधिक पेशंट्स सापडत आहेत. त्यामुळे पालिकेनं पुन्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावं अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

खरंतर दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम म्हणून मध्यंतरी पुणे शहरातील दैनंदिन कोरोना रूग्णांच्या संख्या अगदी हजार - बाराशे पर्यंत खाली आली होती. पण गणेशोत्सवात पुणेकर पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं बाहेर पडले आणि हाच दैनंदिन रूग्ण वाढीचा आकडा पुन्हा एकदा दोन हजारांवर जाऊन पोहोचला असून हीच पुणेकरांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune news