पुणे जिल्ह्याच्या आरोग्य केंद्रातील अधिकारी निघाला 'बेड सेटर'; खाटांसाठी लाखोंची मागणी

पुणे जिल्ह्याच्या आरोग्य केंद्रातील अधिकारी निघाला 'बेड सेटर'; खाटांसाठी लाखोंची मागणी

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे यामुळे वेशीवर टांगली आहेत.

  • Share this:

जुन्नर, 17 मे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकाने कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून जुन्नर सह पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे यामुळे वेशीवर टांगली आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रूग्ण व नातेवाईकांना ॲाक्सिजन, व्हेंटिलेटर व इंजेक्शनसाठी धडपडावे लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकाऱ्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांकडून 1 लाख 80 हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात या आरोग्य कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एवढं होऊन मात्र या कुटुंबातील आई व दोन भावांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे मृतांच्या टाळू वरील लोणी खाण्याच्या या प्रकरणी आरोग्य यंत्रनेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे.

हे ही वाचा-लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून ठाण्यात मयताचा मुलगा सचिन प्रभाकर इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सिन्नर येथील माझी आई तसेच दोन भाऊ व मला कोरोनाची लागण झाली होती. आम्हाला कुठे बेड मिळत नव्हता तेव्हा आम्हाला आळे (ता.जुन्नर) येथील आमच्या नातेवाईकांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी असलेला अमोल बुधा पवार याच्याशी संपर्क केला असता त्याने बेड मिळवून देतो, असे सांगून 1 लाख 80 हजार रूपये द्या अशी मागणी केली. चार पेशंटला बेड मिळणं महत्वाचं होतं, इलाज नव्हता म्हणून तत्काळ कुटुंबीयांनी ऑनलाईन पैसे जमा केले. पुढे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्धच होते. तेथे पवार याने रुग्णांना दाखल केले. त्यातील आई व दोन भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

वरील फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीष डौले करत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 17, 2021, 11:04 PM IST

ताज्या बातम्या