जुन्नर, 11 जुलै : गुन्हेगार गुन्हा करताना एखादा पुरावा मागे सोडतो आणि मग पोलीस आपला पोलिसी खाक्या दाखवत आरोपीला जेरबंद करतात. हे आपण एखाद्या चित्रपटात पाहिलं असेल पण, जुन्नर शहरात अशाच एका फिल्मी स्टाईल गुन्हेगाराचा शोध पोलिसांनी लावला आणि फिर्यादीच आरोपी निघाल्याची घटना पुढे आली.
या घटनेत चाकूचा धाक दाखवून 1 लाख 45 हजारांची रोख रक्कम लूटल्याची आणि मोबाईल लंपास केल्याची फिर्याद देणाराच आरोपी निघाला आहे.लु टीचा बनाव रचणाऱ्यास जुन्नर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांसह अटक केली आहे. तर अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
जुन्नर-शिरोली रस्त्यावर शनिवारी रात्री दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची फिर्याद कुकुटपालन व्यवसायिकांच्या कोंबड्या पोहचविण्यासाठी असलेल्या वाहनावरील 27 वर्षीय वाहनचालक फरहान पठाण याने दिली होती. लूटमार घडल्यावर लगेचच जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या ठिकाणची परस्थिती व फिर्यादीच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्याने फिर्यादीच आरोपी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
जुन्नर पोलिसांनी फरहान पठाणला पोलिसी खाक्या दसखवल्यावर त्यानेच लुटमारीचा बनाव रचल्याचे पुढे आले आहे. पैशांच्या हव्यासापोटी वाहन चालक फरहान याने जुन्नरमधील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महमद शेख या युवकाला हाताशी धरून लुटमारीचा बनाव रचला. महमद शेख याने पुण्यातील पाटील इस्टेट येथे सहा आरोपींना लुटमारीचा बनाव करण्यासाठी नारायणगाव(ता. जुन्नर) येथे बोलावले.
एक दुचाकी व चारचाकी वाहनातून हे आरोपी नारायणगाव येथे आले. जुन्नर वरून शेख हा आरोपी त्यांना नारायणगावला मिळाला. वाहनचालक पठाण याने महमद शेख याच्याशी संपर्क साधून कोंबड्याची वाहतूक करणारी गाडी जुन्नर-शिरोली रस्त्यावर विघ्नहर साखर कारखान्याच्या जवळच्या वीटभट्टीजवळ असल्याचे सांगून या सर्व आरोपींना तेथे जाऊन वाहन चालक आणि क्लीनर यांना बाहेर काढून चाकूचा धाक दाखवून 1 लाख 45 हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केल्याचा बनाव केला.
दरम्यान, क्लीनरला या बनावाची कोणतीच कल्पना नसल्याने पोलिसांच्या तपासत फिर्यादी आणि वलीनर यांच्या माहितीत विसंगती असल्याने पुढील तपासात फिर्यादीच आरोपी निघाला. अखेर जुन्नर पोलिसांनी महमद शेख याला अटक केली. जुन्नर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते पुढील तपास करत आहेत.