पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान, गुंड गजानन मारणे झाला फरार

पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान, गुंड गजानन मारणे झाला फरार

गजानन मारणे याची कोथरूड पोलीस स्थानकातील गुन्ह्यात जामिनावर सुटका झाल्यानंतर आता वारजे पोलीस त्याच्या शोधात आहेत.

  • Share this:

पुणे, 20 फेब्रुवारी : जेलमधून सुटताच तळोजा ते पुणे यादरम्यान 300 चार चाकी गाड्यांची मिरवणूक घेऊन येणाऱ्या गजानन मारणेला पुणे पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्याच्या दाखल गुन्ह्यात अटक केली. मात्र त्याची जामिनावर सुटका झाल्याने आता वारजे पोलीस गजा मारणेच्या शोधात आहेत.

तळोजाहून पुण्यात येताना वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियम पाळायला सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांना गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या सदस्यांनी धक्काबुक्की केली होती. त्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल होता. मात्र पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळताच गजा मारणे आणि त्याच्या टोळीचे सदस्य फरार झाले आहेत. तसं प्रसिद्धी पत्रकच पोलिसांनी काढलं आहे.

जेलमधून सुटल्यानंतर गजानन मारणे याच्या समर्थकांनी काढलेल्या रॅलीवरून पुणे पोलिसांवर चहुबाजूने टीका झाली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला. अशातच आता मारणे आणि त्याचे काही सहकारी फरार झाल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात पोलीस ताबोडतोब कारवाई करण्यात यशस्वी होतात का, हे पाहावं लागेल.

गजा मारणेला कोथरूड प्रकरणात कसा मिळाला जामीन?

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिरवणूक न आल्याने आणि कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा न्यायालयाने मान्य केल्यामुळे गजा मारणेला काही दिवसांपूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यावेळी झालेल्या युक्तिवादात 40 पोलीस ठाणे ओलांडून येवूनही आपल्याला एकाही पोलिसाने अडवले नसल्याचं मारणेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. तसंच कुठलाही गुन्हा केलेला नसताना केवळ मीडिया ट्रायल पोटी कोथरूड पोलिसांनी चुकीची कारवाई केली असल्याचा दावा त्यांनी केला आणि न्यायालयात तो दावा ग्राह्य धरत मारणे याला जामीन दिला.

Published by: Akshay Shitole
First published: February 20, 2021, 5:37 PM IST

ताज्या बातम्या