पुणे, 06 नोव्हेंबर : नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. भावा-बहिणीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. लग्नाचे आमिष दाखवून आतेभावानेच वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान हा संपूर्ण प्रकार पीडित तरुणीची प्रसूती झाल्यानंतर उघडकीस आला असून कुटुंबियांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
20 वर्षीय पीडितेनं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या दरम्यान तरुणी घरी एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो घरी येत होता. त्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तरुणीवर बलात्कारही केला आणि घरच्यांना न सांगण्याची धमकी देखील दिली. दरम्यान या सगळ्या प्रकारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली आणि 31 ऑक्टोबरला तिची प्रसूती करण्यात आली.
आतेभावानं घरच्यांना न सांगण्याची धमकी दिल्यानं तरुणीनं घाबरून ही बाबा कुटुंबियांपासून लपवून ठेवली. मात्र प्रसूतीनंतर या हा सगळा प्रकार समोर आला आणि पीडितेसह कुटुंबियांनी न्याय मागण्यासाठी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी कोळेवाडी इथे राहणारा आरोपी सचिन विठ्ठल झोरे या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे. कोथरुड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असून याची सूत्र प्रमिला क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.