Home /News /pune /

मृत्यूनंतरही 'वैकुंठ' मिळेना! पुण्याच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार नाही

मृत्यूनंतरही 'वैकुंठ' मिळेना! पुण्याच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार नाही

पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचा अंत्यसंस्कार करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याऐवजी आता मनपा या अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करत आहे.

    पुणे, 05 एप्रिल : कोरोना काळात (Coronavirus pandemic) माणुसकी संपत चाललीय का अशी ओरड आपण गेले वर्षभर ऐकत आहोत. पण जीव वाचला तर माणुसकी जपता येईल, असं उत्तर नेहमी दुसऱ्या बाजूने मिळतं. त्यामुळं या चर्चेला अंत नाही. पण आता हा विषय निघण्याचं कारण म्हणजे, पुण्यातून (Pune news) आलेली बातमी. कारण पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कोरोनामुळं मृत्यू (Pune coronavirus News) झालेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याऐवजी आता मनपा या अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करत आहे. पुण्यातील सर्वात मोठी स्माशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैकुंठ स्माशानभूमीत आता कोरोनामुळं मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असं वृत्त पुणे मिररने दिलं आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला. पुण्यातील नवी सदाशिव पेठ परिसरात ही स्मशान भूमी आहे. याठिकाणी रोज जवळपास 80 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जवळपास 5 हजार लोकांची येजा असते. या सर्वांकडून कोरोनाचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियमही व्यवस्थितपणे पाळले जात नाहीत. तसंच या भागातील लोकसंख्येचे प्रमाण पाहता संसर्ग पसरण्याची भीती असल्याने या परिसरातील नाहरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पुणे मनपाने अखेर याठिकाणी कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा - कोरोना आणखी किती स्वप्नं उध्वस्त करणार? पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचा मृत्यू वैकुंठ स्मशानभूमी ही मुळा-मुठा नदीच्या जवळ आहे. तसेच याठिकाणी पारंपरिक अंत्य संस्कार पद्धतीसह विद्युतदाहिनी, डिझेल आणि गॅसद्वारे अंत्यसंस्कार असे अनेक पर्यायही आहेत. त्यामुळं बहुतांश मृतदेहांवर इथंच अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली तेव्हापासून याठिकाणी दररोज कोरोनामुळं मृत्यू झालेल्या जवळपास 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. तर 2020 मध्ये याठिकाणी झालेल्या अंत्यसंस्कारांपैकी जवळपास 40 टक्के कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचे होते. या सर्व परिस्थितीत वैकुंठ स्मशानभूमीत येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात अनेक कोरोनाचा संसर्ग झालेले असण्याची शक्यता असतानाही, ते बिनधास्त परिसरात फिरत असतात. या परिसरात काही वृद्धाश्रम आहेत. तसंच बंगल्यांमध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. त्यामुळं स्थानिकांनी याठिकाणी कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार करू नये अशी मागणी केली. या विषयाचं गांभीर्य पाहता महापालिकेनंही ते मान्य केलं आहे. वाचा - महाराष्ट्रातला डबल म्युटंट कोरोना विषाणू अमेरिकेत आढळला; पहिल्या रुग्णाची नोंद पुणे महानगरपालिकेने यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याचं सांगत नातेवाईकांना कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही असं आश्वासन दिलं आहे. इतर कोणत्या स्मशानभूमीत मृतदेह पाठवायचे हे रुग्णालयांनाच सांगण्यात आलं असून, सर्व मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची योग्य सोय केली जाईल, असं मनपानं सांगितलं आहे. मात्र, कोरोनाच्या या संकटकाळात मरण स्वस्त झालं असलं तरी मुक्ती मिळणं कठीण झाल्याचं यावरून दिसत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19, Pune

    पुढील बातम्या