Home /News /pune /

महाराष्ट्रातील तमाशापंढरीत कोरोनाचा हाहाकार, रुग्णवाढीमुळे प्रशासन झालं हतबल

महाराष्ट्रातील तमाशापंढरीत कोरोनाचा हाहाकार, रुग्णवाढीमुळे प्रशासन झालं हतबल

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार 27 ऑगस्टपासून गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर करून लॉकडाऊन करण्यात येणार आहेत.

जुन्नर, 23 ऑगस्ट : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तालुक्यातील मध्यवर्ती असलेली सर्वात मोठी बाजारपेठ आणि तमाशा पंढरी अशी ओळख असलेल्या नारायणगाव ,वारूळवाडी या दोन गावात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना रोगाचे रुग्ण वाढू नये व सदर रोगाची साखळी रोखली जावी यासाठी जुन्नरच्या तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार 27 ऑगस्टपासून नारायणगाव वारूळवाडी गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर करून लॉकडाऊन करणार आहेत. याबाबत कारवाई देखील सुरू झाली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी लॉकडाऊनबाबत माहिती देत आवाहन केलं आहे. दोन गावातील गणेश मंडळ व नागरिकांची बैठक घेऊन याबाबत समाज माध्यमांवर मेसेज सुद्धा व्हायरल केले आहेत. कोरोना संसर्गामुळे नारायणगाव परिसरातल्या नागरिकांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी व्हायरल केलेल्या मेसेज मधे म्हटलं आहे की, "सध्या गणेशोत्सव सण साजरा होत असून नारायणगाव व वारूळवाडी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असतो. सदर सार्वजनिक मंडळांना आपले ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनामार्फत आवाहन केले जात आहे की,आपण दिनांक 26/ 8 /2020 रोजी( गणपती चा पाचवा दिवस असल्यामुळे )आपण अध्यक्ष, सभासद तसेच आपले मंडळांचे कार्यकर्ते यांनी आपापसात मीटिंग घेऊन सदर दिवशीच विसर्जन करावे. तसेच दिनांक 27/ 8 /2020 रोजी पासून लॉकडाऊन होत असले कारणाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बाहेर पडून विसर्जन करता येणे शक्य होणार नाही. तसंच लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तरी सर्व सार्वजनिक मंडळ तसेच इच्छेनुसार घरगुती गणपती यांनी शक्यतो दिनांक 26/8/2020 रोजी (गणपतीचा पाचवा दिवस ) विसर्जन करावे." जुन्नर तालुक्यात 24 तासांत 41 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून एकूण 783 रुग्ण झाले आहेत. आज दिवसभरात 32 तर एकूण 520 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. आज तालुक्यात ओतूर व खानगाव मध्ये दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. आजपर्यत एकूण 34 रुग्ण कोरोना लढाईत अपयशी झाले. नारायणगाव शहरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. संख्या पाहता आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे दिसत आहे. मंळवार ता.18 रोजी 13,बुधवार 4,गुरुवार 9, शुक्रवार 12 आणि शनिवार 22,रविवार 3 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नारायणगांव परिसरात एका कृषी पर्यटन केंद्रात झालेल्या लग्न व्यवस्थापक आणि कार्यालय मालकांवर कारवाई होणार का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.कारण दोन महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने नागरिक आणि ग्रामस्थ आवाक झाले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नारायणगांव ग्रामपंचायतीने कंबर कसली होती. त्यांना पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने चांगली साथ दिली होती. मात्र मंगळवार ता.18 ऑगस्ट पासून नारायणगांव आणि शिवारात रुग्ण वाढत आहेत. रुग्णांनी एक अंकी वरून दोन अंकावर झेप घेतल्याने उपाय योजना करणारे कोरोना वॉरियर्स, प्रशासन अवाक झाले आहे. आपत्ती व्यावस्थापनेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. कृषी पर्यटन केंद्रात झालेला लग्नसोहळा चर्चेत कृषी पर्यटन केंद्रात नुकताच एक शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला वधू--वरांना आशीर्वाद देण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लग्नसमारंभाचे छायाचित्रीकरणासाठी पाच फोटोग्राफरला आमंत्रित करण्यात आले असल्याचे समजते. या शिवाय वर बाप प्रगतशील शेतकरी आणि अस्सल मराठमोळा व्यापारी असल्याने त्याने व्यापारी मार्केटमध्ये फिरून लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले असल्याचेही समजते. एक आजीबाई पुणे येथे दवाखान्यात उपचार घेत होत्या. मात्र त्यांना नातीचा लग्न सोहळा पाहाता यावा, 'नात' जावयाला आशीर्वाद देता यावे म्हणून आजीला तातपुरता डिस्चार्ज घेऊन लग्नाला उपस्थित ठेवले. त्यानंतर पुन्हा पुणे येथे दवाखान्यात दाखल केले आणि ता.19 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर गुरुवार ता.20 रोजी लग्न सोहळ्यात उपस्थित वऱ्हाडीपैकी दोन,शुक्रवारी दोन आणि शनिवारी पाच अशा एकूण नऊ वऱ्हाडींचे कोरोना चाचणी अहवाल बाधित आले असल्याची अधिकृत्त माहिती आहे. विवाह कार्यमालक आणि कृषी पर्यटन केंद्र मालकांवर गुन्हा दाखल होणार का? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान दोन महिन्यापूर्वी धालेवाडी आणि हिवरे बुद्रुक येथील वधू-वरांचा विवाह घोडेगाव रोडवरील मंगल कार्यालयात पार पडला होता. याला वाचा फुटल्या नंतर त्यांच्यावर कारवाई झाली होती. जुन्नर पोलिसांनी दंड करून करवाई केली होती. येथेही नारायणगांव पोलीस करवाई करणार का? यावर नागरिक आता लक्ष ठेवून आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या