Home /News /pune /

कोरोनाचं गांभीर्य नाहीच? पुणे जिल्ह्यात गाव पुढाऱ्यांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली

कोरोनाचं गांभीर्य नाहीच? पुणे जिल्ह्यात गाव पुढाऱ्यांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली

कोरोना संकट काळातील शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.

पुणे, 18 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिक्रापूर येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. मात्र यावेळी कोरोना संकट काळातील शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे शिक्रापूर पोलीस स्टेशन जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सदरचा प्रकार घडून देखील पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयश्री दोरगे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये रोहिणी गिलबिले यांची उपसरपंच पदी वर्णी लागली. मात्र उपसरपंच निवडणूक पार पडत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशनसमोर असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली होती. तसंच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक नागरिकांनी तोंडावर मास्क देखील परिधान केलेले नव्हते, तर कोरोनाचे संकट असताना देखील नागरिक आणि गावचे पुढारी इतक्यावरच न थांबता त्यांनी ग्रामदैवत मंदिरामध्ये नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली. परंतु निवडीमध्ये उतावळे झालेल्या काही पुढार्‍यांना कोरोना संकटामुळे घालून दिलेल्या शासनाच्या नियमांचा विसर पडला. उपसरपंच यांचा सत्कार करताना अनेकांनी मास्कचा वापर केला नाही. प्रचंड प्रमाणात गर्दी जमवून उपसरपंच यांचा सत्कार केला. काही वेळात याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर गावातील काही नागरिकांकडून यावर कारवाई होणार का? असा सवाल केला जाऊ लागला आहे. पोलीस स्टेशन समोर सर्व प्रकार घडलेला असताना देखील शिक्रापूर पोलीस प्रशासन अद्याप गप्प आहे. तर, काही दिवासापूंर्वीच शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाढदिवस पार्टीवर, एका डॉक्टरांच्या पार्टीवर तसंच बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर सभापतींवर गुन्हा दाखल करत कारवाई करणारे पोलीस याकडे लक्ष देऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या