Home /News /pune /

पुण्यातील जम्बो रुग्णालयाचं बदललं चित्र, काही दिवसांत असा झाला बदल

पुण्यातील जम्बो रुग्णालयाचं बदललं चित्र, काही दिवसांत असा झाला बदल

रुग्ण बरे होण्यास सुरुवात झाल्याने जम्बो रुग्णालयाबाबत आशादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे.

पुणे, 7 सप्टेंबर : पुणे महापालिकेने जबाबदारी स्वीकारल्यानंतर जम्बो रुग्णालयातून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तसंच आयसीयूमधील दोन रुग्णांना बरे वाटल्याने त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे. जम्बो रुग्णालयातील रुग्णांच्या परिस्थितीवर मोठा गदारोळ झाला होता. आता रुग्ण बरे होण्यास सुरुवात झाल्याने जम्बो रुग्णालयाबाबत आशादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसात या रुग्णालयातील मृत्यूही घटले आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आता जम्बो हॉस्पिटलच्या आवारात असलेले बाउन्सर हटवून तिथे महापालिकेचे सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. रुग्णांवर नेमके काय उपचार केले जातात, त्यांची परिस्थिती काय आहे, ते काहीच समजत नसल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांचा तक्रारी निकाली काढण्यासाठी आता महापालिकेने व्हिडिओ कॉलिंगद्वारे दिवसातून तीन वेळा रुग्णांशी संपर्क साधायची यंत्रणा तयार केली आहे. हेल्पडेस्कवर दिलेल्या टॅबच्या माध्यमातून रुग्णाच्या नातेवाईकांना थेट रुग्णाशी बोलता येणार आहे. सोबतच तातडीने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्षही उभा करण्यात आला आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांचीची सगळी माहिती रुग्णांची परिस्थितीही प्रतीक्षा कक्षात बसून नातेवाईकांना कळू शकेल. दरम्यान, पुण्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर चहुबाजूने टीका होऊ लागल्यानंतर आता महानगरपालिकेने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील सह्याद्री आणि इनामदार हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेतलं आहे. तसंच केईएम रुग्णालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याव्यतिरिक्त तीन खासगी लॅबला पुणे महापालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. वेळेत कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती देत नसल्यामुळे महापालिकेने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या