कोरोना चाचणी आणि रुग्णांची हेळसांड, पुण्यातील धक्कादायक वास्तव समोर

कोरोना चाचणी आणि रुग्णांची हेळसांड, पुण्यातील धक्कादायक वास्तव समोर

तक्रारींची शहानिशा केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलं आहे

  • Share this:

पुणे, 27 जून : पुणे शहरात रोज होत असलेल्या कोरोनाच्या साधारण पन्नास टक्के तपासण्या या खासगी लॅबमध्ये केल्या जात आहेत. ज्याचा रिपार्ट सर्वात आधी रुग्णांना मिळतो आणि त्यानंतर 24 तासाने महापालिकेला दिला जातो. त्यामुळे या चोवीस तासात कोरोना रुग्णांना स्वतः शहरात रुग्णालयात बेड शोधण्यासाठी फिरावे लागत आहे. रोज अशा 100 च्या वर तक्रारी मनपाकडे येत आहेत. यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी रिपोर्ट रुग्णांसोबतच महापालिकेला कळवणं आवश्यक आहे.

पुणे शहरात रोज कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर दुसरीकडे महापालिकेकडून मात्र, पुढील एक महिना पुरतील इतके बेडस तयार असल्याचं सांगितलं जात आहे. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

काय आहे पुण्यातील धक्कादायक वास्तव?

पुण्यात रोज होणाऱ्या चाचण्यांपैकी जवळपास पन्नास टक्के चाचण्या ह्या खासगी लॅबमध्ये केल्या जातात. कोरोनाची लक्षण आढळणारे अनेक नागरिक हे परस्पर खासगी लॅबमध्ये जाऊन कोरोना चाचणी करून घेत आहेत. ही चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट महापालिकेला मिळण्याऐवजी आधी रुग्णांना मिळतात. आणि चोवीस तास उलटल्यावर ते रिपोर्ट महापालिकेकडे येतात.

दरम्यानच्या काळात पॉझिटीव्ह रिपोर्ट येणारे रुग्ण हे रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी धावाधाव करतात. खासगी रुग्णालयाकडून अश्या रुग्णांना भरमसाठ फी सांगितली जाते. या सगळ्या प्रकारात आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णांकडून बेड मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यातच खासगी रुग्णालय उपलब्ध बेडची संख्या लपवत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

खासगी लॅब आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे महापौरांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे महापालिका आणि खासगी लॅब मधील समन्वयासाठी आदेश काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेडची संख्या आणि रुग्ण यांच्यातील समन्वयासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचेही मान्य केलं आहे.

खासगी लॅब आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका हा रुग्णांना बसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 27, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या