प्रियांका माळी प्रतिनिधी
पुणे, 25 मे : दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबरपासून चलनातून बाद होणार आहेत. ही माहिती मिळताच सर्वसामान्यांना नोटबंदीचे दिवस आठवले. पण, तेव्हाच्या आणि सध्याच्या नोटबंदीमध्ये बराच फरक आहे. सर्वसामान्य व्यक्तींकडं दोन हजारांच्या नोटा कमी आहेत. पण, लहान-मोठे व्यापारी आणि व्यावसायिक यामुळे चिंतेत आहेत. पुण्यात याचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय.
व्यापारी अडचणीत
दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानं अडचणी वाढत आहे. आता आमची उधारी ही दोन हजारांच्या नोटांमध्येच परत येत आहेत. त्या नोटा बदलण्यासाठी आम्हाला आता बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत, अशी माहिती पुणे मार्केटयार्डमधील व्यापाऱ्यांनी दिली.
'काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 2000 ची नोट बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण, या नोटेमुळे आमची खूप सोय होत होती. आमचा हॉटेलचा व्यवसाय आहे. ग्राहकांनी जेवण झाल्यावर दोन हजाराची नोट दिली तर आम्हाला ती घेण्यावाचून पर्याय नसतो. पण आमच्याकडील ही नोट किराणा दुकानदार किंवा भाजी विक्रेत घेत नाहीत, त्याचा आम्हाला त्रास होतोय, असं एका हॉटेल व्यावसायिकानं सांगितलं. अनेक ग्राहक सध्या दोन हजारांच्या नोटा घेऊन येत आहेत, त्यांना परत पाठवलं तर व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीतीही काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय.
2 हजाराची नोट बदलताना लागणार Pan card? वाचा सविस्तर
2 हजारांच्या नोटा आरबीआय अॅक्ट 1934 सेक्शन 24 (1) अंतर्गत आणल्या गेल्या होत्या. जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटांची तूट होऊ नये म्हणून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. दुसऱ्या नोटा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटांचं उद्दीष्ट संपलं होतं, त्यामुळे 2018-19 सालीच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली होती.
रिझर्व्ह बँकेनं 2 हजाराची नोट चलनातून मागे घेतली असली तरी हा निर्णय म्हणजे नोटबंदी अजिबात नाही, 30 सप्टेंबर नंतरही 2 हजाराची नोट बँकांमधे जमा करता येणार असून त्यापुढेही ही नोट बाळगणं अजिबात गुन्हा नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.