Special Report: 1200 कोटींचा चुराडा? देशातला पहिला बीआरटी प्रकल्प गुंडाळणार

Special Report: 1200 कोटींचा चुराडा? देशातला पहिला बीआरटी प्रकल्प गुंडाळणार

प्रकल्प बंदच करायचा होता तर मग त्यावर आजवर 1200 कोटी खर्च केलेच कशाला असा संतप्त सवाल पुणेकर विचारला आहे.

  • Share this:

पुणे,6 फेब्रुवारी:देशातला पहिला बीआरटी प्रकल्प ठरलेला पुणे बीआरटी प्रकल्प आता गुंडाळण्याचे स्पष्ट संकेत पुणे महापालिकेकडून मिळताहेत. सामान्य पुणेकर पीएमपी प्रवाशांनी मात्र बीआरटी प्रकल्प बंद करण्यास तीव्र विरोध केलाय. प्रकल्प बंदच करायचा होता तर मग त्यावर आजवर 1200 कोटी खर्च केलेच कशाला असा संतप्त सवाल पुणेकर विचारला आहे.

BRT अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट्स. पुणेकरांचा पीएमपी बस प्रवास अधिक जलद व्हावा, या उद्देशाने 3 डिसेंबर 2006 रोजी मोठा गाजावाजा करून देशातला पहिला बीआरटी प्रकल्प पुण्यात सुरू झाला खरा पण नियोजनाच्या अभावामुळे प्रारंभीपासूनच हा प्रकल्प कायमच वादात सापडत राहिला. आधी अपघातांच्या मालिकेनं बीआरटी बदनाम झाली आणि नंतर राजकीय पक्षांची अनास्था. या अशा एक ना अनेक कारणांमुळे बीआरटी अक्षरशः बट्ट्याबोळ झाला. कदाचित म्हणूनच पुण्याचे नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी या महात्वाकांक्षी प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. मात्र, बीआरटी प्रकल्प अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

पुणे बीआरटी तिथपासून आतापर्यंत...

> 2006 मध्ये तत्कालीन खासदार कलमाडींच्या पुढाकारातून पुण्यात बीआरटीचा अवतरली.

> 2007 मध्ये पुण्यात 1200 कोटी खर्चून 110 किमी बीआरटी उभारण्याच्या ठरावाला मंजुरी पण 14 वर्षात फक्त 35 किलोमीटर बीआरटीचेच काम पूर्ण.

> पुण्यात तब्बल 50 हून अधिक बीआरटी बस स्थानकं उभारली. पण बेशिस्त वाहतुकीमुळे बीआरटी पूर्ण क्षमतेनं कधी धावलीच नाही.

> स्वारगेट-कात्रज, दुरूस्तीसाठी बंद.

> हडपसर रोडवरील नगरसेवकानेच उखडून टाकली!

> विश्रांतवाडी मार्गिका अंशतः सुरू.

> मुंबई-पुणे रस्त्यावरील काम अजूनही अपूर्ण.

> औंधरोड बीआरटीचे काम 90 टक्के पूर्ण, पण पोलिसांनीच परवानगी नाकारली.

> नाही म्हणायला नगर रोड आणि पिंपरी साईडची बीआरटी बऱ्यापैकी सुरू होती पण तिथंही आता मेट्रो प्रकल्पांची बांधकामं सुरू झाल्याने तिथंही बीआरटीचा वेग पुन्हा मंदावलाय.

> बीआरटीमुळे खरंतर अनेकांचा प्रवास जलद होऊ लागला होता. म्हणूनच बीआरटी पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यात सुधारणा कराव्यात अशी अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केलीय.

पुण्यातील विविध बीआरटी मार्गांवरून खरंतर आजही रडतखडत का होईना पण तब्बल पाचशेंच्यावर पीएमपी बसेस धावताहेत. बीआरटीवरून धावणाऱ्या बसेसचं दैनंदिन उत्पन्न देखील सामान्य बस पेक्षा एक हजार रूपयांनी अधिक आहे, किंबहुना पुणे बीआरटीनंतरची अहमदाबाद बीआरटी आजही सुसाट धावतेय मग पुण्यातच बीआरटीचा नेमका कशामुळे बोजवारा उडाला तर त्याचं उत्तर शिस्तप्रिय वाहतुकीत सापडतंय. म्हणूनच बीआरटीच्या या दयनीय अवस्थेला राजकीय अनास्थेसोबतच पुणेकरांची वाहतुकीचे नियम न पाळण्याची सवयही तितकीच कारणीभूत असल्याचं बोललं जातं. पुणे मनपाचे नवे आयुक्त अभ्यासाअंती बीआरटीला कायमचं इतिहासजमा करतात की नवसंजीवनी देतात, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2020 09:38 PM IST

ताज्या बातम्या