• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुणे : तब्बल 10 तोळे सोने असलेली पर्स हॉटेलवर राहिली, त्यानंतर जे घडलं ते सिनेमापेक्षा कमी नव्हतं!

पुणे : तब्बल 10 तोळे सोने असलेली पर्स हॉटेलवर राहिली, त्यानंतर जे घडलं ते सिनेमापेक्षा कमी नव्हतं!

महिलेला दहा तोळ्यांचे दागिने परत मिळवून दिले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याबाबत सोमनाथ वाफगावकर यांचे कौतुक केले आहे.

  • Share this:
आंबेगाव, 23 डिसेंबर : मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर यांच्या तत्परतेमुळे दहा तोळे सोन्याचे दागिने अवघ्या 2 तासात परत मिळाले आहेत. मुंबई येथील एक कुटुंब विवाह सोहळ्यासाठी नगर जिल्ह्यात गेले असता त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे. लग्नसोहळा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य परतत असताना मंचर जवळील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबले. तिथं ते दागिन्यांची पर्स विसरून निघून गेले परंतू पुढे गेल्याने ही बाब लक्षात आली आणि पुन्हा त्या हॉटेलला जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी दागिन्याची पर्स नसल्याने थेट मंचर पोलीस स्टेशन गाठले आणि मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर यांनी पर्समधील मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यानंतर अवघ्या दोन तासात या महिलेला दहा तोळ्यांचे दागिने परत मिळवून दिले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याबाबत सोमनाथ वाफगावकर यांचे कौतुक केले आहे. नेमकं काय घडलं? संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर पोलिसांचे दैनंदिन काम चालू असताना मंचर पोलीस स्टेशनला एक दाम्पत्य अगदी केविलवाना चेहरा करून डोळ्यातून अश्रू वाहत असताना पोलीस स्टेशनच्या दरवाजात उभे राहिले. पोलीस नाईक तुकाराम मोरे, ठाणे अंमलदार अजित मडके त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावत असताना हे दाम्पत्य तिथे आले. संजय बजरंग मोहिते आणि त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते (दोघे राहणार कळंबोली मुंबई) हे दिनांक 18/12/2020 रोजी त्यांचे नातेवाइकांचे लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे गेले होते. त्यानंतर दिनांक 19/12/2020 रोजी ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल रविकिरण येथे कुटुंबियासह चहापान करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थांबले होते. चहापान करून सदर कुटुंब त्यांचे खाजगी वाहनातून मुंबईसाठी रवाना झाले. सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर अर्चना संजय मोहिते यांना आठवण झाली की त्यांची सुमारे दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेल रविकिरण एकलहरे येथील टेबलवरच राहिली आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा हॉटेल रविकिरण येथे येऊन पाहणी केली असता तेथे त्यांची पर्स जागेवर मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता ते बसलेल्या ठिकाणचा कॅमेरा बंद असल्याने सदर कॅमेरामध्ये त्यांना काहीएक माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशन गाठले. पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी त्यांची माहिती घेऊन सदर घटनेबाबत तात्काळ पोलीस अमलदार सोमनाथ वाफगावकर यांना दिली. सोमनाथ वाफगावकर यांनी लगेच त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांच्या पर्समधील मोबाईलचा नंबर हस्तगत करून सायबर पोलीस स्टेशन येथून त्याचे लाईव्ह लोकेशन घेऊन सदर मोबाईल चाकण आळंदी फाटा ते आळंदी रोडच्या दरम्यान असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी लागलीच हॉटेल रविकिरणचे मालक युवराज शेठ कानडे यांना संपर्क केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आज हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबीयांचे लग्न समारंभ होता. त्यावेळी सोमनाथ वाफगावकर यांनी सदर लग्न प्रमुख श्री लक्ष्मण खोसे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना संपर्क साधून त्यांचे लोकेशन विचारले असता त्यांनी त्यांचे लोकेशन आळंदी परिसरात असलेबाबत सांगितले. त्यामुळे पोलीस सोमनाथ वाफगावकर यांनी त्यांचे वऱ्हाडचे सर्व गाड्या तत्काळ तेथेच थांबणे बाबत त्यांना सूचना दिल्या आणि गाडीत सदर काळे रंगाचे पर्सची पाहणी करणे बाबत विनंती केली. त्यामुळे लक्ष्मण खोसे यांनी त्यांचे वऱ्हाडाची सर्व गाड्या रस्त्यात थांबून सर्व गाड्यांची पाहणी. त्यावेळी त्यांचे लक्षात आले की हॉटेलमधील लग्न समारंभ संपले नंतर परत जाताना नजर चुकीने टेबलवर राहिलेली एक काळ्या रंगाची पर्स त्यांच्या गाडीत आली आहे. त्यानंतर त्यांनी सोमनाथ वाफगावकर यांना संपर्क साधून त्यांची पर्स सुखरूप असलेबाबत कळविले. त्यानंतर सदर मोहिते दाम्पत्याने सदर श्री लक्ष्मणराव खोसे साहेब यांचे घरी जाऊन ती पर्स ताब्यात घेतली असून त्यांचे सर्व 10 तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल फोन सुखरूप मिळाल्याने त्यांनी मंचर पोलीस स्टाफ आणि पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर तसेच श्री लक्ष्मण खोसे आणि महेंद्र खोसे यांचे विशेष आभार मानले. त्यावेळी त्यांचे दागिने परत मिळलेले पाहून त्यांचे डोळ्यात आनंद अश्रू मावत नव्हते.
Published by:Akshay Shitole
First published: