चार दिवसांत होत्याचं नव्हतं झालं, कोरोनामुळे 3 सख्ख्या भावांचा मृत्यू

चार दिवसांत होत्याचं नव्हतं झालं, कोरोनामुळे 3 सख्ख्या भावांचा मृत्यू

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तीन ज्येष्ठ सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:

पुणे, 26 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चांडोली खुर्द गावात कोरोनामुळे शेतकरी कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आज या तिघा भावांचा सामूहिक दशक्रिया विधी पार पाडण्यात आला. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तीन ज्येष्ठ सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

दिगंबर इंदोरे (वय 75), वामन इंदोरे (वय 65) व सुदाम इंदोरे (वय 64 ) अशी मृतांची नावे आहेत. सुदाम व वामन हे दोघे चांडोली खुर्द येथे शेजारीच राहत होते, तर दिगंबर हे चांडोली बुद्रुक गावात राहत होते. सुदाम भिवंडी येथे पेपर मिल मधील कागदाच्या रिंग पुरवण्याचे काम करत होते. ते भैरवनाथ सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष होते. लॉकडाऊन झाल्यापासून गेली सहा महिने त्यांचे वास्तव्य चांडोली खुर्द येथे होते. वामन हे मंचर येथील बाजार समितीत कांदा बटाट्याचे आडते म्हणून काम करत होते, तर दिगंबर हे सर्वात थोरले असून चांडोली येथे शेती करत होते.

या तिघाही भावांचे गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात मोठे योगदान होते.या तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालय कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र 17 सप्टेंबर रोजी वामन, दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी दिगंबर व त्यानंतर दोन दिवसांनी 20 सप्टेंबर रोजी सुदाम यांचा मृत्यू झाला. एकामागोमाग एक अशा घरातील तीन ज्येष्ठ सदस्यांना गमावल्यामुळे इंदोरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी काहीसा धसका घेतला आहे. मात्र हार नाही मानली. गावात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने प्राथमिक उपचारासाठी गावातल्या शाळेत उपचार केले जातात. या ठिकाणी गावातलेच डॉ.मंगेश निराळे मोफत उपचार करत आहेत.

खरंतर कोरोनामुळे शहरांसोबत खेडेगावातही भीतीचं वातावरण आहे. यावर उपचारासोबत कोरोना रुग्णांना व सामान्य माणसांना मानसिक आधारही देण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 26, 2020, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading