पुणे, 9 जून : पुण्यात कोरोनाची माहिती घेण्यासाठी केंद्रिय समितीने सोमवारी दिवसभर कंटेनमेंट झोनची पाहाणी करत काही नवीन उपाययोजना महापालिकेला सुचवल्या आहेत. आज स्मार्ट सिटीच्या कार्यालयात केंद्रिय समितीकडून कोरोनाच्या वॉर्डवाईज डॅशबोर्डची पाहाणीही करण्यात येणार आहे. देशभरात ज्या शहरांनी कोरोना काळात उत्तम नियोजन केलं आहे, त्याची चाचपणी करून एक मॉडेल तयार करण्याचं काम केंद्रिय समिती करणार आहे.
केंद्रिय समितीने दिलेल्या सूचना :
- कम्युनिटी पार्टिसिपेशन वाढवा, लोकांचा प्रतिसाद वेगाने यायला हवा
- कोरोनातून बरे झालेल्या लोकांना संरक्षण द्या, त्यांना चांगले चेहरे म्हणून प्रमोट करा
- खाजगी रूग्णालयातील बेडसची उपलब्धता पारदर्शी हवी
- रूग्णांना बेड अभावी शोधाशोध करावी लागू नये यासाठी सतत मॉनिटरिंग करावं
- केसेस ॲडमिनीस्टरेशनच क्रिटीकल ॲनालिसीस करा, ॲम्ब्युलंस मिळण्यापासून ते रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत वेळेच्या नोंदी घेऊन सुधारणा करणारी यंत्रणा उभी करा
पुण्यात काही भागांत कोरोनाचा आकडा वाढला
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने पोलिसांनी या भागातून रूटमार्च काढला आणि लोकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये या भागात अवघे 12 रुग्ण होते, पण लॉकडाऊन 4 दरम्यान नियम शिथिल होताच इकडे रूग्ण संख्या थेट 372 वर पोहोचली आहे. विशेषत: जनता वसाहत आणि पानमळा या स्लम एरियात कोरोनाची साथ वेगाने पसरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने दिलेल्या सूचना महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
पुण्यात 8 जून रोजी काय होती कोरोनाची स्थिती?
- दिवसभरात 181 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 166 रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात 13 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 8062
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2486
- एकूण मृत्यू -391
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 5185
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 2108