पुणे, 22 जानेवारी : कोरोना संकटावर मात करण्यासाठी लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ( serum institute fire) आग लागल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पुण्यातील (pune) प्रभात रस्त्यावरील वस्तीत राहणाऱ्या प्रतिक पाष्टेच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली.
पुण्यातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक14 मध्ये प्रतिक पाष्टे हा आपल्या आई-वडील आणि छोट्या भावासोबत राहत होता. त्याचे वडील रुग्णालयात दाखल आहेत. हातावर पोट असणारे हे कुटुंब आहे. छोटा भाऊ पंधरा वर्षे वयाचा आहे. तर त्याच्या आईचा प्रभात रस्त्यावरच चहाचा स्टॉल आहे. प्रतिकने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण करून कामाला सुरुवात केली होती. आपल्या कुटुंबाचा तो आधार बनू पाहत होता. परंतु, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. काम करत कर त्याला शिक्षणाला सुरुवात केली होती. पुण्यातील महाविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. नुकताच कोर्स संपला होता.
गुरुवारी दुपारी तो महेंद्र इंगळे आपल्या वरिष्ठ सहकाऱ्या सोबत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही.
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत सीरम इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. 'सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करत आहोत,' असं सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 5 जणांचा मृत्यू
21 जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली. अंदाज असा होता की 4 लोक अडकले आहेत. ही माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. त्यांनी या लोकांची तातडीने सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरू झालं. या इमारतीत वरच्या मजल्यावर कोणी असल्याची माहितीच नव्हती. हा मजला जळून खाक झाला होता. आग विझल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचले असता 5 जण मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलं. मृतदेह ससून रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहेत.
ही आग वेल्डिंगच्या कामादरम्यान लागल्याचं सांगण्यात येत आहे. पण आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.