POSITIVE NEWS: सर्वाधिक रुग्णांच्या यादीत पुणे जिल्ह्याचं नाव, मात्र कोरोनाला दूर ठेवण्यात 636 गावांना आलं यश

POSITIVE NEWS:  सर्वाधिक रुग्णांच्या यादीत पुणे जिल्ह्याचं नाव, मात्र कोरोनाला दूर ठेवण्यात 636 गावांना आलं यश

पुणे जिल्ह्यातील तब्बल 636 गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळवलं आहे.

  • Share this:

पुणे, 14 ऑगस्ट : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशा जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्ह्याचंही नाव येतं. मात्र अशा स्थितीतही याच पुणे जिल्ह्यातील तब्बल 636 गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळवलं आहे.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या गावांना चांगलीच कसरत करावी लागली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर आणि गावपातळीवर अनेक निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावांनी स्वयंस्फूतीर्ने गावात बंद पाळले. हे बंद पाळताना गावातील आरोग्य यंत्रणा सुरू राहील याची काळजीही घेण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या गावांमध्ये दोन अनेकदा औषध फवारणी करण्यात आली. यासोबतच बाहेरून येणाऱ्यांसाठी विलगीकरण कक्षही स्थापन करण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक गावात दक्षता समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात विलगीकरण कक्षासोबतच बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले. जे नागरिक बाहेरून आले त्यांचे विलगीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती गावांनी कोरोनाला रोखलं?

जुन्नर 64

खेड 68

मावळ 25

मुळशी 47

आंबेगाव तालुका- 48

बारामती तालुका- 60

भोर 99

दौंड 32

हवेली 18

इंदापूर 70

पुरंदर 28

शिरूर 31

वेल्हा 46

महत्त्वाच्या उपायोजनांमुळे कोरोनाला रोखण्यात आलं यश :

- जिल्हा परिषदेच्या शाळा आणि काही इमारती अधिग्रहित करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.

- पहिला रूग्ण आढळल्यापासून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन आजारी व्यक्ती आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी त्यांनी केली.

- जिल्ह्यात टप्प्याटप्याने कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले.

- नागरिकांमध्ये आजाराविषयी सातत्याने जनजागृती करण्यात आली.

- बाहेर जातानाही या गावातील नागरिकांनी काळजी घेतली.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तातडीची बैठक घेतली. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना' बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2020, 6:07 PM IST

ताज्या बातम्या