पुण्यातून सकारात्मक बातमी; कोरोना काळात घटलं आत्महत्येचं प्रमाण, 'ही' आहेत कारणं

पुण्यातून सकारात्मक बातमी; कोरोना काळात घटलं आत्महत्येचं प्रमाण, 'ही' आहेत कारणं

पुण्यात गतवर्षीच्या तुलनेत आत्महत्यांच्या संख्येत चक्क घट झाल्याचं आढळून आलं आहे.

  • Share this:

पुणे, 19 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊन काळात आर्थिक अरिष्ट आणि नैराश्यापोटी आत्महत्यांचं प्रमाण वाढल्याची भीती व्यक्त होत होती.पुण्यात मात्र गतवर्षीच्या तुलनेत आत्महत्यांच्या संख्येत चक्क घट झाल्याचं आढळून आलं आहे.

लॉकडाऊन काळात पुण्यात आर्थिक अरिष्टामुळे लागोपाठ एकदोन आत्महत्यांच्या घटना घडल्याने पुणेकर पुरते हादरून गेले होते. पण एकूण आत्महत्यांच्या संख्येवर नजर टाकली तर गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असल्याचं आढळून आलं आहे. एसएनडिटी कॉलेजचा मानसशास्त्र विभाग आणि पुणे पोलिसांच्या एका अभ्यासपूर्ण संशोधनात ही बाब समोर आली आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 13 टक्क्यांनी आत्महत्या कमी झाल्याचे या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी मार्च ते जुलै 2019 या कालावधीत शहरात 305 आत्महत्या घटनांची नोंद होती. तर 2020 मार्च ते जुलै या टाळेबंदीच्या 264 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. टाळेबंदीत अनेक जण सहकुटुंब घरी होते. त्यामुळे नैराश्य आलं तरी कुटुंबांतील इतर सदस्यांनी दिलेला मानसिक आधार आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना घराबाहेरच पडता आलं नाही. पर्यायाने आत्महत्या करण्यासाठी संबंधितांना पुरेशा संधीच उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, असं महत्वपूर्ण निरीक्षण या अहवालाच्या संशोधिका आणि एसएनडीटी कॉलेजच्या उपप्राचार्या माधवी कुलकर्णी यांनी नोंदवलं आहे. 

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विभक्त कुटुंबातील लोक आणि त्यातही गरिबांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलं आहे. कारण अर्थातच आर्थिक अडचणी हेच आहे. एरवी प्रेमभंग, मानसिक स्वास्थ ही आत्महत्येची प्रमुख कारणं सांगितली जातात. म्हणूनच लॉकडाऊन उठताच आत्महत्या वाढण्याची भीती देखील या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच पोलिसांनी वाढत्या आत्महत्या वेळीच रोखण्यासाठी आत्तापासूनच जनजागृती अभियानपर कार्यक्रम हाती घेतले आहेत. पुण्याचे सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी ही माहिती दिली.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात लोकांना एकतर घराबाहेर पडता आले नाही, त्यामुळे नैराश्यग्रस्तांना प्रेमप्रकरणातून रेल्वे रुळाकडे जाणे, पुलासह नदीवर किंवा विहिरीकडे धाव घेता आली नाही. यात आणखी एक बाब म्हणजे घरात जीवन संपविण्याऐवजी संवाद वाढल्यानं जीवनाचे महत्व कळलं गेलं असावं असाही एक तर्क काढला गेला आहे. 

टाळेबंदीत आत्महत्या कमी होण्यास कौटुंबिक संवाद हा प्रमुख आधार ठरला आहे. तर दुसरीकडे कोरोना सारखं संकट उभे राहिल्याने झालेली मानसिकताही नैराश्याला थारा देणार नाही असा निष्कर्ष नोंदविला जात आहे. तर अनलॉक नंतर येणारी आव्हानं झेलण्याची मानसिक तयारी लोकांना करावी लागणार आहे, असं म्हटलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या