• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यातील भामट्याने लावला अनोख्या व्यवसायाचा शोध, 3 वर्षानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यातील भामट्याने लावला अनोख्या व्यवसायाचा शोध, 3 वर्षानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Pune : बोगस पाहुणा बनून कपाळी गंध, डोक्यात टोपी, खांद्यावर टॉवेल असा खास लग्नाळू पाव्हण्याचा साज परिधान करून तो मंगल कार्यालयात जायचा.

  • Share this:
जुन्नर, 1 एप्रिल : पुण्याचा (Pune) भामटा हा शब्दप्रयोग तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण या शब्दाला साजेसं काम एका भामट्याने केलं आहे आणि या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गावाकडे सध्या लग्न समारंभ (Wedding Ceremony) जोरात सुरू आहेत. आता लग्न म्हटलं की आहेर देणं-घेणं व मानपान स्वीकारणे हे आलंच. फार पूर्वीपासून चालत आलेली ही सामाजिक परंपरा आजही टिकून आहे. लग्नात आहेर देणे व मानपान स्वीकारणे हा प्रकार नातेसंबंध दृढ व्हावेत म्हणून ग्रामीण भागात अजूनही सुरू आहे. आहेर केल्याविना मंगल कार्यालयातून बाहेर पडणे मनाला खटकणारी बाब असल्यामुळे आहेर स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणारेही पाहुणे काही कमी नाहीत. नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन एका भामट्याने बोगस पाहुणा बनून कपाळी गंध, डोक्यात टोपी, खांद्यावर टॉवेल असा खास लग्नाळू पाव्हण्याचा साज परिधान करून तो मंगल कार्यालयात जायचा. जिथे रुखवत मांडला तिथे जाऊन बाजूलाच खुर्ची टाकून बसायचा. पुढ्यात नवीकोरी स्टीलची टाकी ठेऊन त्यावर वही व पेनाची मांडणी करायचा. विवाह समारंभाच्या निमित्ताने समोर उपस्थित असलेल्या शहरी पाहुण्यांना दणदणीत नमस्कार घालायचा. बोलताना आहेर स्वीकारत असल्याचे सूचित करायचा व रोख स्वरूपातील आहेर गोड बोलून गोळा करायचा. वहीमध्ये आहेर करणाऱ्याचा नावाची नोंदही करायचा. प्रसंगी लग्नकार्यात रुखवद गाडीत भरून देण्यापर्यंतचे तसेच इतर बारीकसारीक कामेही करू लागायचा. अन् मग सर्वांची नजर चुकवून आहेराचे गाठोडे घेऊन पोबारा करायचा....असा या भामट्याचा दिनक्रम सुरू होता. हेही वाचा - मोठी बातमी : पुणे-सोलापूरसह महत्त्वाच्या इतर 2 महामार्गांवरील टोल दरात वाढ, जाणून घ्या नवे दर दररोज विविध मंगल कार्यालयातून आहेराच्या हजारो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या या भामट्याला ओतूर पोलिसांनी बुधवारी अटक केली असून ओतूर परिसरात या भामट्याच्या अक्कलहुशारीवर हास्याचे फवारे उडत आहेत. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील संदीप सगन धोतरे असं या पाहुण्याचे नाव असून त्याच्यावर आहेराच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी भा.द. वि. क.406 नुसार ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं कसं उघड झालं भामट्याचं बिंग? याबाबत लालखन हिवरे येथील रुपाली चंद्रशेखर बेनके यांनी पोलिसात तक्रार केल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. बुधवारी 30 माार्च ला ओतूरजवळ राज लॉन्स या मंगल कार्यलयात बेनके यांच्या पुतणीच्या लग्नात या बोगस पाहुण्याने 8 हजार 500 रुपयांच्या आहेराचा अपहार केला. या प्रकरणी धोतरे याच्या विरुद्ध ओतूर पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दाखल केली होती. ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नाईक एन. बी.गोराणे, मुकुंद मोरे,पंकज पारखे यांचे पथकाने संबधीत आरोपीस ता.30 मार्च रोजी शुभश्री लॉन्स कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पो.नाईक एन. बी. गोराणे हे करत आहेत. दरम्यान, या एका प्रकरणातून अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. याबाबत पोलिसानी अधिक माहिती घेतली असता या भामट्याने अणे-माळशेज पट्ट्यातील अनेक मंगल कार्यालयातून असे गुन्हे केल्याचे कबूल केले असून सन 2018 सालापासून या महाठगाणे आगळ्या वेगळ्या व्यवसायाचा शोध लावून स्वतःला या कार्यात वाहून घेतल्याची कबुली दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: