खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन, पुण्यात पोलीस हवालदाराने केले मजुराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन, पुण्यात पोलीस हवालदाराने केले मजुराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

पोलीस हवालदार अंबादास थोरे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचं कौतुक केलं जातंय. अंबादास यांनी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन केलेल्या या कामातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

  • Share this:

पुणे, 3 मे : कोरोनामुळे (corona) राज्यात लॉकडाउन (lockdown) लावलंय. त्यामुळे पोलिसांचं काम वाढलं आहे. पोलिसांना प्रत्येक चौकात बंदोबस्तासाठी उभं राहावं लागतंय. मात्र, न थकता ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. समाजातील शिस्त, सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारी रोखणं आणि गुन्हेगारांना पकडणं हे पोलिसांचं मुख्य कर्तव्य. पण पुण्यातल्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या 26 वर्षांच्या अंबादास थोरे (Ambadas Thore) या पोलीस हवालदारानं त्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन अनोख्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. एका परप्रांतीय मजुरावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्याचं सामाजिक कर्तव्यही या पोलिसाने आपणहून केलं आहे, पुणे मिररने हे वृत्त दिलंय.

पुण्याच्या सणसवाडी परिसरात 28 एप्रिलला एका 45 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळला. सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय माने यांनी या घटनेबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृताचं नाव लालसिंह माँझी (Lalsingh Manjhi) असून तो बिहारचा रहिवासी होता. या बांधकाम मजुराचा त्याच्याच मित्राने खून (murder) केला होता. या मृतदेहाचं शवविच्छेदन करून झालं होतं. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर नव्हतं. त्यामुळे अंबादास थोरे यांच्यासमोर पुढे काय करायचं, असा प्रश्न उपस्थित राहिला. त्यानंतर तपासा दरम्यान पोलिसांनी त्यांच्या घरच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

(वाचा - मरणही परवडेना! स्मशानात जाण्यासाठी उकळले बक्कळ पैसे; रुग्णवाहिका चालकाला अटक)

अंबादास थोरे म्हणाले, 'मी त्याच्या एका मित्राला फोन करून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांचा फोन नंबर मिळवला आणि मृताच्या बिहारमध्ये असलेल्या वडिलांना याबद्दल सांगितलं. लॉकडाऊनमुळे (Lockdown) येऊ शकत नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. तसंच लॉकडाऊन असल्याने आणि वेळ जास्त जाणार असल्याने मृतदेह बिहारला (Bihar) पाठवणं देखील शक्य नव्हतं. त्यामुळे मृताच्या कुटुंबियांनी मलाच त्याचे अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला आमच्या मुलाप्रमाणे मानतो, तुम्हीच अंत्यविधी करा आणि आम्हाला व्हिडिओ कॉलच्या (video call) माध्यमातून त्यांचं अंतिम दर्शन घडवा.'

‘मृताच्या कुटुंबियांच्या विनंतीनंतर मी शिक्रापूर ग्रामपंचायतीशी संपर्क साधून अंत्यविधीची तयारी केली आणि लालसिंह माँझी याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड, बबलू शेख, पप्पू चव्हाण, सिकंदर शेख यांचं विशेष सहकार्य लाभलं,’ असंही पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितलं.

(वाचा - Corona Vaccination : कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय करावं आणि काय नाही?)

पोलिसांनी या घटनेतील आरोपीची ओळख पटवली असून त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस हवालदार अंबादास थोरे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचं कौतुक केलं जातंय. एरवी पोलीस, गुन्हेगार, मराठी, बिहारी अशा वेगवेगळ्या नावानी ओळखल्या जाणाऱ्या माणसाला कठीणक्षणी मात्र माणुसकीच कामी येते. अंबादास यांनी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन केलेल्या या कामातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: May 3, 2021, 2:20 PM IST

ताज्या बातम्या