पुणे, 18 जुलै; पोलीस असल्याची बतावणी करत अनेकांना लुटणाऱ्या भामट्याला पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन जेरबंद केलं आहे. हर्षल आनंद सपकाळ (वय-24) असं आरोपीचं नाव आहे.
हवेली तालुक्यातील वाघोली परिसरात आरोपी हर्षल सपकाळ हा आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दुकानदार व्यावसायिक तसेच रस्त्याने जाणार्या-येणार्या नागरिकांना अडवून पैसे मागत होता. भामट्यानं आपल्या कारमध्ये पोलीस अधिकाऱ्याची काठी व टोपी ठेवली होती.
हेही वाचा...पत्नीला कोरोनाची लागण! शिवसेनेच्या या मंत्र्यांनी घेतला स्वत: क्वारंटाइन होण्याचा निर्णय
याबाबत ओंकार तुपे ,निखिल मेदनकर या तरुणाने पुढाकार घेत याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. लोणीकंद पोलिसांनी देखील तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. या भामट्यावर नाशिक, जालना येथे देखील गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणिकंद पोलिस करत आहेत.
कोरोना अधिकारी असल्याचं सांगून केली मोठी फसवणूक
दरम्यान, राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यात राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या काळात चोरट्यांचाही सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना अधिकारी असल्याचं सांगून नागरिकांची मोठी लूट केल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील चेंबूर इथं कोरोना अधिकारी असल्याचं सांगून एका व्यक्तीला 54 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी खोट्या कोविड अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
फिर्यादी अब्दुल याकूब शेख (वय- 49) हे चेंबूर येथील सरस्वती विद्यालयासमोरुन स्टेशनकडे जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून ते कोरोना अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर अब्दुल शेख यांची कागदपत्रांची बॅग तपासून त्यामध्ये असणारे कॅनरा बँकेचे एटीएम व त्याचा पिन नंबर हातचलखीने घेऊन एटीएमने त्यांच्या खात्यातील 54 हजार रुपये काढून फसवणूक केली.
हेही वाचा...धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अब्दुल शेख यांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ह फुटेज तपासून गुन्ह्यात वापरलेली मोटारकार होंडा सिटी MH 04CM7200 ही निष्पन्न करून गाडी मालकाकडे तपास केली. त्यानंतर आरोपी सोहन गणेश वाघमारे यास अटक करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.