पुणे 11 जुलै: कोरोनाचं शहरात संकट असतांनाच पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची पुन्हा साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली. PMRDAचे विक्रम कुमार हे महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून ते महापालिकेच्या आयुक्तपदावर होते. पुण्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांची मोठी भूमिका होती. सध्या कोरोनाचा उद्रेक वाढलेला असतानाच ही बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या आधी साखर आयुक्त आणि सांगितलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द गाजली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पृथ्विराज चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर आज नियमावली ठरवण्यासाठी पुणे महापालिकेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी मनपा आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लॉकडाउनसाठी एक सारखीच नियमावाली असणार असल्याची शक्यता होती. पण, याबद्दल अद्याप निर्णय झाला नाही.
पुण्यातील इंदापुरात कोरोनाचा पाचवा बळी, आरोग्य केंद्रातील नर्सलाही लागण
तर लॉकडाउनच्या काळात पहिले पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. फक्त मेडिकल आणि दूध डेअरी सुरू राहणार आहे. तसंच भाजीपाला ही बंद राहणार असल्याची माहिती मिळतेय. पुण्यात वृत्तपत्र पहिले पाच दिवस बंद राहणार आहे. एवढंच नाहीतर शहरात फिरण्यासाठी ही पोलिसांचा परवाना लागणार आहे.