मंचर, 29, नोव्हेंबर: अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. त्यासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे नव्याने वृक्षलागवड व्हावी. त्याबाबतचा संदेश समाजात रुजावा, या उद्देशानं पुण्याजवळील गावडेवाडी गावात दशक्रियेच्या निमित्तानं देशी झाडांची लागवड करण्यात आली.
एवढंच नाही तर उपस्थितांना 'आई-नाना प्रतिष्ठान'तर्फे मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम-30 आदींचे वाटप करण्यात आलं. गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयाला पुस्तके भेट देण्यात आली.
हेही वाचा...एका आदर्श लग्नाची गोष्ट, गावातील विद्यार्थ्यांना केले 7 संगणक दान
गावातील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार निवृत्तीबुवा गायकवाड यांचे गेल्या आठवड्यात निधन झालं. आज, रविवारी त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कवठ, फणस आदी पर्यावरणपूरक सुमारे 200 हून अधिक झाडे लावण्यात आली.
कोरोनाच्या काळात ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे, हे आपल्याला पटलं आहे. त्यामुळे दशक्रिया विधीच्या निमित्तानं असे वृक्षलागवडीसारखे तसेच, कोरोना जागृतीबाबतचे उपक्रम राबवायला हवेत, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.
वड, पिंपळासारखी देशी झाडे पक्षी, प्राण्यांना आणि एकूणच निसर्गाला उपयुक्त असतात. हे लक्षात घेऊन ही झाडे लावण्याचा निर्णय घेतला, असे 'आई-नाना प्रतिष्ठान'तर्फे स्पष्ट करण्यात आले. ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे यावेळी प्रवचन झाले. सूत्रसंचालन माजी सरपंच देवराम गावडे यांनी केलं.
दरम्यान, ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज गायकवाड हे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक 26 चे चालक अध्यक्ष होते. गेल्या 68 वर्षे त्यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. आळंदी येथील माऊलींच्या मंदिरात, पंढरपूर येथील विठ्ठलच्या मंदिरात तसेच भामचंद्र डोंगर, गावडेवाडी या ठिकाणी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी साक्षरता, व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. विविध सामाजिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.
हेही वाचा...स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही या गावात पूल नाही; ग्रामस्थ अशी पार करतात नदी
आळंदी येथील धर्मशाळा बांधण्यातही निवृत्ती बुवांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सूना नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्राचार्य डॉ. पांडुरंग गायवाड, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड, पत्रकार मधुकर गायकवाड यांचे ते वडील होत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune, Pune news