05 मे : पुण्यातील कचराकोंडीला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र कचराकोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करु शकलेली नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्यानं शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळं आरोग्याचाही धोका निर्माण झाला आहे.
तरदुसरीकडे पुणे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस इथल्या वनविभागाची जागा महापालिकेला उपलब्ध झाली असून गावकरी आहणि राजकारणी यांचा मात्र याला विरोध आहे. सरकारने मात्र जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेले 20 दिवस पुण्यात कचरा कोंडी सुरुय.फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कचरा डेपोची अंत्ययात्रा काढत हा डेपो कायमचा बंद झाल्याचं जाहीर केलं. हे कधी ना कधी होणार होतं म्हणून प्रशासन पर्यायी जागेच्या शोधात होतं.
वढू तुळापूरला विरोध झाल्यावर पिंपरी सांडसची वनविभागाची 19 हेक्टर जमीन अखेर उपलब्ध झाली आहे. या जागेच्या आसपास लोकवस्ती नाही, पाण्याचे स्रोत नाहीत आणि मुख्य म्हणजे या जागेवर कचरा डेपो नाही तर कचरा प्रक्रिया होईल असं प्रशासनाने सांगितलंय, पण ग्रामस्थांचा यावर विश्वास नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा