पिंपरी चिंचवड, 14 जुलै : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) काही दिवसांपूर्वी भररस्त्यावर दिसेल त्या व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये कोयते आणि धारदार शस्त्र दाखवून भाईगिरी करण्याचे प्रकार वाढले होते. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या भाईंना चांगलाच धडा शिकवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज उर्फ रावण गायकवाड आणि मयुर उर्फ यम सरोदे असं या दोन गुंडांचं नाव आहे. या दोघांनीही कोयते नाचवत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
पुण्यातील लोणीकळभोर आणि पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात राहणाऱ्या या दोन तरुणांनी गुन्हेगारी जगतात भाई म्हणून मिरवण्यासाठी केलेले असे उद्योग त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. दहशत पसरविण्याच्या उद्धेशाने हातात शस्त्र घेऊन असे व्हिडीओ पोस्ट केल्या प्रकरणी आधी हा रावण आणि आता या यम नामक गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी ह्या गुंडांना अटक केली आणि स्वयंघोषित भाई कुख्यात भाई म्हणवणाऱ्या या गुंडांची कशी ताटा खालच्या मांजरा सारखी अवस्था झाली हेही पोलिसांनी समोर आणले. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा दोघांनी हात जोडून माफीच मागितली. याही पुढे जाऊन पोलीस आता या भाईंची धिंडही काढणार आहेत.
अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केल्या गेल्यास पोलिसांची वचक निर्माण होईल यात शंका नाही मात्र गुन्हेगार असो की सामन्य माणूस कायदा सर्वांसाठीच सारखाच आहे. तेव्हा सोशल मीडियावर शस्त्राने केक कापणे किंवा शस्त्रासोबत फोटो आणि दहशत निर्माण करणारा मजकूर टाकत असाल तर जरा जपून.
काही दिवसांपूर्वी,सांगवी परिसरात प्रतीक खरात आणि चेतन जावरे या दोन गुंडांनी दारू पिऊन पिंपळे निलखच्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण मारहाण केली होती. हातात कोयता घेऊन त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. सोमवारी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक करून दोघांची त्याच रस्त्यावर नेऊन धिंड काढली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune news, पिंपरी-चिंचवड