'पत्नी पांढऱ्या पायाची, तू आमदार, मंत्रीही नाही होणार'; पुण्यात महाराजाच्या सांगण्यावरुन सुनेचा छळ
'पत्नी पांढऱ्या पायाची, तू आमदार, मंत्रीही नाही होणार'; पुण्यात महाराजाच्या सांगण्यावरुन सुनेचा छळ
Crime in Pune: बायकोच्या ग्रहमानात दोष असल्याचं सांगत एका प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला लावल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका अध्यात्मिक गुरूला अटक केली आहे.
पुणे, 12 जुलै: 'तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचं ग्रहमान दूषित झालं आहे. त्यामुळे तुझी ही बायको तुझ्यासोबत कायम राहिली तर तू आमदार किंवा मंत्रीही होणार नाही. त्यामुळे राजकीय यश मिळवायचं असेल तर तू तुझ्या बायकोला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे,’ असं सांगून एका प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला लावल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका अध्यात्मिक गुरूला अटक केली आहे. संबंधित अध्यामिक गुरुच्या सांगण्यावरून सुशिक्षित कुटुंबानं अघोरी कृत्य करत सुनेचा छळ लावला होता. याप्रकरणी पीडित सुनेनं चतुःश्रृंगी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
रघुनाथ राजाराम येमूल असं अटक केलेल्या 48 वर्षीय अध्यात्मिक गुरूचं नाव असून तो बाणेर परिसरातील धवलगिरी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. आरोपी रघुनाथ येमूल याचे पुणे शहरात आणि जिल्ह्यात शेकडो भक्त आहेत. पण एका सुशिक्षित कुटुंबाला सुनेचा छळ करण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा सल्ला दिल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी महाराज येमूल याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा-आईला कामावरून काढल्यानं तरुण भडकला; कंपनीत जाऊन कोयत्यानं मारहाण करत घातला राडा
याबाबतची अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी पीडित महिलेनं अघोरी कृत्य आणि कौटुंबीक छळाप्रकारणी गणेश ऊर्फ केदार गायकवाड, नानासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, भागिरथी पाटील, राजू अंकुश अशा 7 जणांवर गुन्हा दाखल केला होता. चतुःश्रृंगी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. अध्यात्मिक गुरुच्या सांगण्यावरून महिलेचा छळ केल्याची माहिती पोलीस तपासात उघड होताच पोलिसांनी अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल याला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा-पुण्यातील दत्तवाडी परिसरात कुख्यात गुंडाची हत्या, कोयत्याने सपासप वार करुन ठार
फिर्यादीनं तक्रारीत म्हटल्यानुसार, डिसेंबर 2019 मध्ये एकेरात्री फिर्यादी आपल्या बाळासह बेडरूममध्ये झोपल्या होत्या. दरम्यान त्यांना कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता याठिकाणी आरोपी सोनाली आणि दीपक गवारे हे बेडरूमच्या बाहेर हळदी-कुंकू लावलेल्या टाचण्या मारलेला लिंबू एका पिशवीत ठेवताना दिसले. यानंतर पीडितेन हा प्रकार आपले पती गणेश यांना सांगितला. यावेळी पती गणेश यानं 'तू पांढऱ्या पायाची असून तू जोपर्यंत मला घटस्फोट देणार नाहीस, तोपर्यंत मी आमदार किंवा मंत्री होणार नाही. अध्यात्मिक गुरू रघुनाथ यमूल यांनी दिलेला लिंबू तुझ्यावरून उतरवून टाकला तर तुझी पीडा कायमची निघून जाईल, असं सांगितलं. यानंतर पीडितेनं चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.