पुणे 27 ऑक्टोबर: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांचं राजकीय सख्य सगळ्यांनाच माहित आहे. अनेक दिवसानंतर हे दोनही नेते मंगळवारी पुण्यात एकाच कार्यक्रमात सोबत होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज बैठक झाली. त्या बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. त्या दोघांचीही बसण्याची व्यवस्था ही शेजारीच केलेली होती आणि त्यांच्यात गप्पाही रंगल्या होत्या. त्यामुळे बैठक संपल्यानंतर त्यांना धनंजय मुंडे यांच्यासोबतचे मतभेद मिटले का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी थेट उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.
समाजाच्या हिताच्या प्रश्नावर आम्ही दोघे एकत्र आलो तर यात वावगं काहीच नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले तर आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून काही चांगलं होण्याचा प्रश्न नाही तर आमच्या पक्षाचा प्रॉब्लेम होईल असं मिश्किल उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं.
बीड जिल्ह्यातल्या राजकारणात दोघांमध्येही जोरदार वर्चस्वाची लढाई आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत दोनही नेत्यांच्या गप्पा रंगल्याने पत्रकारांमध्येही त्याची चर्चा होती. या गप्पांचा राजकीय अर्थ काढू नका असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
पुणे- उस तोडणी कामगारांसाठी आयोजित बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगल्या गप्पा. मतभेदांच्या मुद्यावर नंतर पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका... pic.twitter.com/m3a4KFqJct
— News18Lokmat (@News18lokmat) October 27, 2020
दोनच दिवसापूर्वी दसऱ्या मेळाव्यांतर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यातल्या चर्चेला जास्त महत्त्व होतं. ऊसतोड कामगार संघटना आणि साखर संघ यांच्यातील कराराबाबत ऊसतोड संघटनाची प्रतिनिधी तथा लवाद म्हणून आपण समाधानी असून इतर कोण काय बोलतं याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही असं परखड मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.