विघ्नेश्वर गणपतीचे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात, चोरली होती दीड किलोची चांदीची छत्री

विघ्नेश्वर गणपतीचे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात, चोरली होती दीड किलोची चांदीची छत्री

अष्टविनायकातील सातवा गणपती असलेल्या ओझरच्या श्रीमंत विघ्नेश्वर गणपतीच्या मंदिरात महिनाभरापूर्वी चोरी झाली होती.

  • Share this:

जुन्नर, 27 ऑगस्ट: अष्टविनायकातील सातवा गणपती असलेल्या ओझरच्या श्रीमंत विघ्नेश्वर गणपतीच्या मंदिरात महिनाभरापूर्वी चोरी झाली होती. या चोरीतील चोरांना पकडण्यात ओतूर पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केलं आहे.

हेही वाचा...चालत्या-बोलत्या महालक्ष्मी.. सासूबाईनं केलं दोन्ही सुनांचं गौरी म्हणून पूजन!

ओझरच्या विघ्नेहर गणपती मंदिरात 27 जुलैला दीड किलो वजनाची सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री आणि दानपेटीमधील रक्कम चोरीस गेली होती. यामुळे संपूर्ण तालुक्यात तसेच गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली होती. पोलीस प्रशासन तपासला सरसावले. मात्र काही केल्या या चोरीचा धागा त्यांना सापडत नव्हता. पोलिसांनी श्वान पथक, हस्तरेषा तज्ज्ञ यांना देखील पाचारण केले होते.

ओझर गणपती मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये या चोरीची घटना कैद झाली होती. यामध्ये दोघे जण चोरी करताना दिसत होते. मात्र हे दोघे कोण? हे ओळखणे पोलिसां समोर मोठं आव्हान होतं. मात्र, अखेर हा तपास गणेशोत्सवात लागला. या कारवाईचं संपूर्ण गणेश भक्तांनी समाधन व्यक्त केलं जात आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की, आळेफाटा पोलिसांकडून संदीप सखाराम पतवे व विठ्ठल महादू पतवे (रा.कळस खुर्द, ता.अकोले, जि.अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेवून कसून चौकशी करुन तपास केला. त्यांनी ओझर येथील गणपती मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

भादंवि कलम 457,380,34 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तसेच आरोपींकडून मंदिरात चोरी करण्यासाठी मदत केलेल्या लक्ष्मण विठ्ठल पतवे, अविनाश पांडुरंग सावंत (रा.कळस, ता.अकोले, जि.अहमदनगर) या दोघांची नावे सांगितलेली आहेत. तसेच पंधराशे रुपयांची रोकड आणि मंदिरातील चांदीची छत्री चेपवलेल्या अवस्थेत आरोपींच्या राहत्या घरी लपवलेले निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

उपविभागिय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे, पोलिस नाईक विकास गोसावी, पोपट मोहरे, हेड कॉंस्टेबल पंकज पारखे, देविदास खेडकर, नवनाथ कोकाटे यांनी तपास केला.

हेही वाचा...बनावट ई-पास बनवणाराच निघाला मनसेचा पदाधिकारी, पोलिसांची मोठी कारवाई

गणेशोत्सवात लागला तपास...

ओझर येथील विघ्नेहर गणपती मंदिरातील चोरीचा गणेशोत्सव काळातच तपास लावला असल्याने गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. वेळोवेळी अनेक घटनांमध्ये पोलिस विभाग टीकेचे वाटेकरी होता. मात्र कोरोना प्रादुर्भाव काळात पोलिसांनी ताणतणावात देखील भाविकांच्या भावना जाणून घेत जलद गतीने तपास लावल्याने पोलिसांवरील टीकेचं संकट विघ्नहर कृपेनेच टळलं, अशी चर्चा सर्वसामान्यांमधून होत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 27, 2020, 7:08 PM IST

ताज्या बातम्या