जुन्नर,22 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात गेली आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे बाजारावरही परिणाम झाला आहे. कांद्याचे भाव आता गगनाला भिडले आहे. त्यामुळे चोरांनी आता पुन्हा एकदा कांद्याकडे आपला मोर्चा वळल्याचे पाहण्यास मिळाले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीच्या गणेशनगर(देवाची जाळी) शिवारात बुधवारी मध्यरात्री 2 ते 2.30 च्या दरम्यान कांदाचाळीतला कांदा चोरी करताना दोन चोरांना शेतकऱ्यांनी पकडले. संजय गेनभाऊ पारधी व पोपट काळे अशी चोरांची नावे असून त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक MH14-1125 पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. मात्र, एक चोर मात्र चोरीसाठी वापरलेली मालवाहतूक रिक्षा घेऊन तो फरार झाल्याचं उघड झाले आहे.
लवकरच चांगले घडेल, उदयनराजेंनी दिले नव्या राजकारणाचे संकेत, VIDEO
शेतकऱ्यांनी या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जवळच माल वाहतूक रिक्षा लावून हे दोन चोर दुचाकीवरून कांदा गोणीत भरून वाहतूक करत होते. मात्र, मध्यरात्री हा प्रकार सुरू असताना दिलीप थोरात यांना जाग आली आणि त्यांनी आरडा ओरडा करत ही चोरी पकडली. देवजाळी येथील नाथा कोंडाजी थोरात व अनिल चक्कर पाटील या शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतला कांदा चोरी करताना हे चोर पकडले गेले.नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात एक चोर पकडून दिला असून एक चोर दरम्यान फरार झाला आहे.
कांद्याने शंभरी पार केल्याने आता कांदा चाळीतला कांद्याला सोन्याचे भाव आले आहेत. याचा फायदा काही चोरांनी घेतल्याचे पुढे आला आहे.
नव्या सीमोल्लंघनासाठी तयार राहा, पंकजा मुंडेंची समर्थकांना महत्त्वाची सूचना
दरम्यान, व्हॉट्सअॅप ग्रुपवर चोर पकडल्याची माहिती आज सकाळी व्हायरल झाली. तेव्हा दुचाकीचा मालक या ठिकाणी पोहचला. आणि आपली दुचाकी चोरीला गेल्यास त्यांनी सांगितलं. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी दुचाकी आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. या प्रकारामुळे चोरी मागे अनेक जणांचं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आधीच साठवून ठेवलेला कांदा सडत होता. त्यात अवकाळी पावसाने लागवड झालेला कांदाही सडला. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये कांद्याला सोन्याचे भाव येणार आहेत आणि कांदा चाळीत असलेल्या कांद्याला सोन्यापेक्षाही जास्त सुरक्षा द्यावी लागणार आहे, हे मात्र नक्की.