गुढीपाडवा 2 दिवसांवर आल्यानंतरही बाजारपेठा ओस; झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल

गुढीपाडवा 2 दिवसांवर आल्यानंतरही बाजारपेठा ओस; झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल

Pune News: गुढीपाडवा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण राज्यातील कोरोना स्थितीमुळे गुढीपाडव्यात वापरली जाणारी झेंडू फुले मातीमोल झाली आहे. याचा आर्थिक तोटा (Big Loss) फुल उत्पादक शेतकऱ्यांना (Marigold grower farmers) सोसावा लागत आहे.

  • Share this:

पुणे, 11 एप्रिल: साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त मानला जाणारा आणि हिंदू नववर्ष दिन म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा (Gudhipadwa 2021) सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असलं तरी राज्यातील कोरोना स्थितीमुळे गुढीपाडव्यात वापरली जाणारी झेंडू फुले मातीमोल झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरातील आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा ओस पडल्या आहे. परिणामी मागणीही घटली आहे, या जबदस्त आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

पाडवा जवळ आल्यानं शेतकऱ्यांनी झेंडू फुलांच्या तोडणीला सुरुवात केली आहे. मात्र राज्यात कोरोना लॉकडाऊनच्या (Coronavirus Weekend Lockdown in Maharashtra) भीतीमुळे फुलांना अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकप्रकारे नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मांमध्ये गुढीपाडवा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी घरातील देवदेवतांसोबतचं घरातील गाडी-घोड्यांचीही पूजा केली जाते. घराच्या दारांवर पाना-फुलांची तोरणं बांधली जातात. या विधीसाठी झेंडू फुलांची प्रचंड मागणी असते. हा सणाचा मोसम लक्षात घेऊन शेतकरीही मोठ्या प्रमाणात झेंडू फुलाची शेती करतात.

(हे वाचा-गेल्यावर्षी अशीच दिसली होती मायानगरी! मुंबईत कसं होतंय Weekend Lockdownचं पालन?)

झेंडूच्या शेतीतून शेतकऱ्यांना दरवर्षी गुढीपाडवा आणि लग्नाच्या मोसमात मुबलक पैसे मिळतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गुढीपाडव्याच्या काळात झेंडूला प्रतिकिलो 70 ते 100 रुपये असा दर मिळतो. पण यावर्षी मात्र 15 ते 25 रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याची माहिती मंचर येथील झेंडू उत्पादक शेतकरी वनिता विलास बेंडे पाटील यांनी दिली आहे.

(हे वाचा-PHOTOS:पुण्यात सलग दुसऱ्या वीकेंड लॉकडाऊनचं काटेकोर पालन; गजबजणारे रस्ते पडले ओस)

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तोडणीला आलेला झेंडू वावरातच सोडून द्यावा लागला होता. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोना विषाणूची साथ पूर्णपणे ओसरली होती. त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याला झेंडू विक्रीतून चांगले पैसे मिळवता येतील या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. मात्र यावर्षीही कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. परिणामी यावर्षीही झेंडू उत्पादनाचा खर्च अंगावर येण्याची भीती झेंडू उत्पादक शेतकरी वनिता विलास बेंडे यांनी व्यक्त केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 11, 2021, 5:02 PM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या