पुण्यात लॉकडाऊन नाही, पण लागू झाले नवे नियम; महापौरांनी दिली माहिती

पुण्यात लॉकडाऊन नाही, पण लागू झाले नवे नियम; महापौरांनी दिली माहिती

शहरात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली.

  • Share this:

पुणे, 21 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. एकेकाळी कोरोनाचं केंद्र झालेल्या पुणे शहरात मात्र अद्याप लॉकडाऊनबाबत हालचाली सुरू करण्यात आलेल्या नाहीत. असं असलं तरी काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली.

'गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याची सूचना आपण केली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,' असं महापौर म्हणाले.

पुणे शहरात नवे कोणते नियम लागू होणार? महापौरांनी दिली ही माहिती

- खासगी रुग्णालयांचे कोविडसाठीचे बेडस् जे आधी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. ते पुन्हा उपलब्ध करुन देण्याची सूचनाही या बैठकीत केली. तसेच NIV मध्ये असलेली टेस्टिंग कॅपसीटीची अडचण लक्षात घेऊन ही क्षमता वाढवण्याबाबत तातडीने विचार व्हावा. कारण मागील वेळी आलेल्या अनुभवानुसार दोन-तीन दिवस जर अहवाल यायला लागले तर संसर्ग वाढू शकतो, याबाबतची चर्चाही बैठकीत केली.

- मायक्रो कंटेन्मेंट झोनच्या बाबतीत लवकर निर्णय घेतला जात असून त्याबबतही आदेश पारित केले जाणार आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रामुळे देशात पुन्हा वाढला कोरोना; मोदी सरकारनं उद्धव ठाकरे सरकारला खडसावलं

- दाटवस्तीत छोटे दवाखाने गेल्या वेळी बंद ठेवले गेले. काहींनी नक्कीच जबाबदारीचं भान राखत उत्तम कामगिरी बजावली. पण वस्तीत छोट्या दवाखाण्यांचा नागरिकांना मोठा आधार असतो. त्यामुळे असे दाखवणे सुरु राहतील याचीही सूचना बैठकीत दिली.

- विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार नाही. मात्र मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे.

- शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे.

- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावरील महापालिकेचा सविस्तर आदेश लवकरच प्रसिद्ध केला जाईल.

- शहरात रात्री 11 वाजल्यानंतर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून आपणही रात्री 11नंतर घराबाहेर पडणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकेल.

Published by: Akshay Shitole
First published: February 21, 2021, 6:21 PM IST

ताज्या बातम्या