पुणे, 31 मे: अखेर आज खेड पंचायत समितीचे सभापती (khed panchayat samiti chairperson) शिवसेनेचे भगवान नारायण पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. 11 विरुद्ध 3 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं समजतंय. खेड तालुक्यात पहिल्यांदाच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. 24 मे रोजी पोखरकर यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
आज सकाळी 11 वाजता त्या ठरावावर मतदान घेण्यसाठी पंचायत समिती सदस्यांची सभा बोलवण्यात आली होती. या सभेस सर्व 14 पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. अटक असतानाही सभापती पोखरकर यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानासाठी आणण्यात आलं होतं.
सभेत ठराव मंजुरीसाठी मांडल्यानंतर 11 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून पाठिंबा दिला. शिवसेनेचे सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, वैशाली जाधव, सुनिता सांडभोर, अंकुश राक्षे, मच्छिंद्र गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी, मंदाबाई शिंदे, नंदा सुकाळे आणि वैशाली गव्हाणे आणि भाजपचे सदस्य उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेचे सभापती पोखरकर, ज्योती अरगडे आणि काँग्रेसचे अमोल पवार यांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले.
हेही वाचा- सामान्य रेल्वे प्रवासी अजूनही वेटिंग लिस्टमध्ये, आणखी बघावी लागणार वाट
पोखरकर यांच्याकडून समितीच्या महिलांवर हल्ला
शिवसेनेच्याच असलेल्या खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर आज मतदान होणार होतं. त्यामुळे पोखरकर यांच्या दहशतीला घाबरुन खेड पंचायत समितीतील शिवसेनेचे 6 सदस्य, भाजपचे एक सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य सिंहगड परिसरातील एका हॉटेलवर आपल्या परिवारासह येऊन थांबले होते.
27 मे रोजी पोखरकर यांनी गुंडांच्या मदतीनंहॉटेलमध्ये थांबलेल्या महिला पंचायत समिती सदस्यांच्या रुमचे दरवाजे तोडले. त्यानंतर महिला सदस्यांसह त्यांच्या पतींना कोयता, गज आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकारानंतर पोखरकर यांना अटक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, Khed, Maharashtra, Pune, Pune news