मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात नाईट कर्फ्यू : बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सचं कंबरडं मोडलं, जगणं झालं कठीण

पुण्यात नाईट कर्फ्यू : बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सचं कंबरडं मोडलं, जगणं झालं कठीण

एक वेळच्या अन्नासाठी सेक्स वर्कची धडपड;119 वर्षांचा मुलगा बनला देवदूत;800 कुटूंबाना रेशन किटच वाटप

एक वेळच्या अन्नासाठी सेक्स वर्कची धडपड;119 वर्षांचा मुलगा बनला देवदूत;800 कुटूंबाना रेशन किटच वाटप

ऐन लॉकडाऊन काळात तर देहविक्री करणाऱ्या महिलांना (Sex Workers) कुणीही वाली नव्हता.

पुणे, 16 मार्च : कोरोनाच्या (Coronavirus) काळात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. देहविक्री करणाऱ्या महिलांना (Sex Workers) तर कुणीही वाली नव्हता. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात उपासमार, औषधांची चणचण अशा अनेक समस्यांना तोंड देत पुण्यातल्या जवळपास साडेतीन हजार देहविक्री करणाऱ्या महिलांनी अत्यंत हलाखीत दिवस काढले.

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या अनेक संस्था या सर्वोच्च न्यायालयमध्ये गेल्या आणि या महिलांना जगण्यासाठी सरकारने तातडीची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना तातडीने कुठल्याही पुराव्याशिवाय कोरडे धान्य आणि रोख मदत देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री निधीतून देहविक्री करणाऱ्या एका महिलेला महिना पाच हजार रुपये तर शिक्षण घेत असलेल्या मुलासह देहविक्री करणाऱ्या महिलेला साडेसात हजार रुपये प्रति महिना अशी मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

लॉकडाउनच्या काळात अत्यंत बिकट अवस्थेत गेलेल्या या महिलांना लॉकडाऊन उठल्यानंतर काहीसा आर्थिक आधार मिळेल असं वाटत होतं. मात्र नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीने या महिलांच्या उत्पन्नात तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. दिवसभरात येणार्‍या ग्राहकांकडून मिळणार्‍या तुटपुंज्या पैशांमध्ये उदरनिर्वाह चालवायचा प्रयत्न या महिलांकडून केला जात आहे.

दरम्यानच्या काळात जवळपास दीड हजार महिलांना राज्य सरकारकडून प्रतिमहिना पाच हजार रुपये अशी तीन महिन्यांसाठीची पंधरा हजार रुपयांची मदत थेट खात्यावर मिळाली आहे. देहविक्री करण्याची नोंद असलेल्या जवळपास सात हजार महिलांची नोंद पुण्यामध्ये आ. त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करून दीड हजार महिलांना जवळपास सव्वा दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र उर्वरित साडेपाच हजार महिलांच्या बँक अकाउंट आणि तत्सम माहिती अभावी अजूनही त्यांना मदत पोहोचू शकलेली नाही.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीमध्ये अत्यंत कठोर भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे थोडाफार सुरू झालेला व्यवसायही पुन्हा बंद झाला आहे. या अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं असा प्रश्न सारिका शिंदे (नाव बदललेलं आहे) हिने विचारला आहे.

लॉकडाऊनमध्ये झालेल्या दुरवस्थेमुळे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या काही एनजीओनी पुढे येत या व्यवसायातून बाहेर पडून इतर कुठलाही व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या महिलांची यादी तयार केली होती. त्यात जवळपास 40% देहविक्री करणाऱ्या महिलांनी इतर कुठलाही पर्याय उपलब्ध असल्यास देहविक्रीचा व्यवसाय सोडून तो अवलंबण्याची तयारी दाखवली होती.

या संकल्पनेवरही काम सुरू आहे. मात्र आताची सगळ्यात मोठी समस्या आहे ती दोन वेळच्या जेवणाची... पोट भरण्याची...चिल्यापिल्यांच्या दुधाची आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाकडून मदत म्हणून मिळालेला कोरडा शिधा शिजवण्यासाठी गॅसची. हा संघर्ष हेलावून टाकणारा आहे. त्यामुळे या महिलांकडे कायम उपेक्षेने बघणाऱ्या कथित पांढरपेशा समाजाने थोडी संवेदनशीलता दाखवत यांना मदत करण्याची गरज आहे.

First published:
top videos

    Tags: Pune (City/Town/Village), Pune news