पुणे, 13 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे. याबाबत पूजाचे मित्र असलेल्या दोन तरुणांनी पोलीस जबाबात माहिती दिली आहे.
पुणे पोलिसांनी अरूण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत. तसंच मुलीच्या आई वडिलांचेही जबाब नोंदवले. यामधून पोलिसांच्या हाती नवनवी माहिती येत आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पुणे पोलीस तपास करणार करणार आहेत.
पूजाच्या बहिणीनेही केला होता खुलासा
पूजा चव्हाण हिची छोटी बहिण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिने म्हटलं आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल.
'दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहिण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे,' असं दिया चव्हाण हिने म्हटलं आहे.
डोक्याला झाली आहे गंभीर दुखापत
पूजा चव्हाण हिचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, अशी शक्यता आहे. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की आणखी काही..याबाबत अद्याप नेमका खुलासा झालेला नाही.
पुण्यात आत्महत्या करणारी पूजा चव्हाण कोण? महाराष्ट्राच्या राजकारणाशी काय संबंध
मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन
पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी अखेर मौन सोडलं आहे.
'या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल.जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने...एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्नं केला जातोय...असाही प्रयत्नं होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात आपली भूमिका जाहीर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pooja Chavan, Pune police, Sanjay rathod, Suicide