Home /News /pune /

मराठा क्रांती मोर्चा आता प्रत्येक आमदाराला देणार निवेदन, आरक्षणप्रश्नी नवी व्यूवरचना

मराठा क्रांती मोर्चा आता प्रत्येक आमदाराला देणार निवेदन, आरक्षणप्रश्नी नवी व्यूवरचना

बैठकीला उपस्थित 100 हून अधिक समन्वयकांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली.

पुणे, 11 डिसेंबर : मराठा आंदोलकांच्या गाडी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 14 डिसेंबरला मंत्रालयावर राज्यभरातून गाडी मोर्चा धडकणार होता. मात्र आता या मोर्चाला परवानगी नाकारल्याने आंदोलक आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या 10 डिसेंबर रोजी झालेल्या झूम मिटिंग(VC) मध्ये निर्णय घेण्यात आला. तसंच या बैठकीला उपस्थित 100 हून अधिक समन्वयकांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणप्रश्नी 14 आणि 15 डिसेंबरला आझाद मैदानात ठिय्या आंदोलन होणार आहे. पीडित उमेदवारांच्या उपोषणात मराठा समन्वयकही सहभागी होतील. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागेल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून मांडण्यात आली. आझाद मैदान येथे 14 व 15 डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदरचे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ESBC व SEBC मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत. या उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न,सारथी संस्था गतिमान करणे ,अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला ,मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित केसेस मागे घेणे,यांसह इतर मागण्या सोडविण्यासाठी विधिमंडळातील आमदारांनी सदरचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत असे आवाहन सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे. 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे तो पर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पुढील आंदोलनाच्या जनजागृती साठी व न्यायालयीन लढ्यात देखील सर्वानी सहभागी होऊन व आपापल्या परीने योगदान द्यावे. हे प्रश्न सुटले नाही तर पुन्हा पुन्हा छोटी छोटी आंदोलने करण्यापेक्षा पुन्हा एकदा मोठ्या ताकतीने समाजाला एकसंघ करून आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी सर्वांनी आगामी आंदोलन व्यापक व अभूतपूर्व करावे लागेल, असा इशाराही क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसेल तर सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला निवेदन देणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation

पुढील बातम्या