पुण्यातील कोरोनाचे नवे 7 कोरोना हॉटस्पॉट आले समोर, प्रादुर्भाव वाढण्याचं नेमकं कारण काय?

पुण्यातील कोरोनाचे नवे 7 कोरोना हॉटस्पॉट आले समोर, प्रादुर्भाव वाढण्याचं नेमकं कारण काय?

पुणे शहरातील उपनगरे झालेल्या गावांमध्ये अतिशय झपाट्याने कोरोना आपले हातपाय पसरताना दिसत आहे.

  • Share this:

पुणे, 22 फेब्रुवारी : पुण्यातील दैनंदिन कोरोना रूग्णवाढ 600च्या वर गेल्यानंतर आता कुठे शहरातील नवे कोरोना हॉटस्पॉट ठळकपणे समोर येऊ लागले आहेत. गेल्या आठवड्याभरातील शहरातील दैनंदिन रूग्णवाढीवर एक नजर टाकली तर पुणे शहरातील उपनगरे झालेल्या गावांमध्ये अतिशय झपाट्याने कोरोना आपले हातपाय पसरताना दिसत आहे.

मुंढवा, हडपसर, धायरी, वडगाव, बिबवेवाडी, बाणेर, कर्वेनगर ही मूळची गावं आता सर्वाधिक कोरोनाग्रस्त बनून गेली आहे. एकट्या धायरी गावात आजमितीला 112 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्ण आहेत. त्यातही धायरी गावठाणात झपाट्याने रूग्ण आढळून येत आहेत. याचं कारण अर्थातच लोकांकडून सोशल डिस्टन्सचं पालन न होणं आणि मास्क न वापरणे हाच म्हणावा लागेल. म्हणूनच पालिकेनं रात्रीचे संचार निर्बंध लावण्यासोबतच तात्काळ नवे कोरोना प्रतिबंधित मायक्रोझोन्स जाहीर करून तिथल्या वाढत्या कोरोना फैलावावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास फारसा वेळ लागणार नाही.

पुण्यात गेल्यावर्षी 9 मार्चला सिंहगड रोड परिसरात पहिला रूग्ण सापडल्यानंतर त्याचा फैलाव वाढला होता. तो शहराच्या मध्यवर्ती पेठांमधून... भवानीपेठ हा मे 2020 मधील पुण्यातला पहिला कोरोना हॉटस्पॉट ठरला होता. पुढे मग सोमवारपेठ, शुक्रवार पेठ, पू्र्व भाग असा प्रवास करत कोरोना येरवडा, नगररोड, ढोलेपाटील रोड असा प्रवास करत शहरांच्या सर्व झोपडपट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणावर फैलावला होता.

सप्टेंबर 2020 मध्ये तर पुणे शहरात कोरोनाचा शब्दश: प्रकोप बघायला मिळाला. त्यातून शहरातील कोरोना मृत्यूची संख्या साडेचार हजाराच्यावर पोहोचली तर कोरोना बाधितांचा आकडा दीड लाखाच्यावर पोहोचला होता. पण नोव्हेंबरनंतर कोरोनाची लाट पुन्हा ओसरली आणि पुणेकराचं जनजीवन तब्बल 8 महिन्यांनी पू्र्वपदावर आलं होतं.

हेही वाचा - मातोश्रीतून मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना खास आदेश

पुणेकरही मग काहीसे बेफिकीर होऊन निर्धास्त होऊन रस्त्यांवरून फिरू लागले. विनामास्कच बाजारपेठांमधून गर्दी करू लागले...राजकीय आंदोलनं म्हणू नका की सांस्कृतिक कार्यक्रम अशा सगळ्याच विनामास्क वाल्यांची गर्दी वाढू लागली....मग काय व्हायचं तेच झालं... अगदी जानेवारी 2021 संपेपर्यंत आटोक्यात येऊ पाहणारा कोरोना फेब्रुवारी महिना उजाडताच पुन्हा डोकं वर काढू लागला आणि आता तर दैनंदिन रूग्णवाढ सहाशेच्यावर जाऊन पोहोचली आहे.

अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्याही 1200 वरून 2800 वर गेली आहे. तेव्हा कुठे प्रशासन खडबडून जागं झालं आणि कामाला लागलं आहे. पण आता पुणेकरांनीही वेळीच सावध होऊन मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ही त्रिसूञी अंगिकारली नाही तर पुढचा लॉकडाऊन अटळ होऊन बसेल.

Published by: Akshay Shitole
First published: February 22, 2021, 11:42 PM IST

ताज्या बातम्या