पुणे, 4 फेब्रुवारी, गोविंद वाकडे : आज भाजपने पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. कसबा मतदारसंघात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. कसबा मतदारसंघात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीच्या वाटयाला आली आहे.
अधिकृत घोषणा नाहीच
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकलेली नाहीये. पक्षात जे इच्छूक आहेत त्यानांच उमेदवारी मिळावी, अन्यथा या निवडणुकीत सहकार्य करणार नाही अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादीतून मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ
राष्ट्रवादीकडून चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे यांच्या नावावर सिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याच मुख्य कारण म्हणजे राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांकडून विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातीलच इच्छूकांमधून एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्यामुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.