रायचंद शिंदे, प्रतिनिधीपुणे, 26 मे: जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Tehsil Pune) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्षाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धामणी येथील युवक कार्यकर्ता सचिन जाधव (NCP activist Sachin Jadhav) यांचा आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला असून त्याचा मृतदेह (deadbody) आणि गाडी (Car) नगर जिल्ह्यात जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मंचर पोलिसांनी पाच ते सहा तासातच आरोपीला जेरबंद केले आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्याच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या पोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच काल थिटे आणि सुर्यवंशीने त्यांची हत्या केली. याच ठिकाणावरून जाधव यांच्याच गाडीत मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने नेली.
वाचा: VIDEO: विरारमध्ये 50 वर्षीय इसमाला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथं दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा आरोपींचा इरादा होता. दुसरीकडे जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मंचर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि आज जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलीस मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.