पुणे, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातू पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याविषयी तिखट प्रतिक्रिया दिली आणि राज्याचं राजकारण ढवळून निघालं. पवार कुटुंबासह राष्ट्रवादीतही बैठकांचं सत्र सुरू झालं. या वादंगानंतर पार्थ पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात, असंही बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील बारामतीत असल्याने चर्चांना आणखीच जोर मिळाला.
या पार्श्वभूमीवर मतभेद दूर करण्यासाठी बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सध्यातरी तसं होणार नसल्याचं दिसत आहे. कारण आत्ता पुण्यात असलेले शरद पवार तासाभरात बारामतीत दाखल होणार असले तरीही सध्या बारामतीत असलेले अजित पवार थोड्याच वेळात मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यामुळे संयुक्त बैठकीची शक्यता मावळली आहे.
प्रफुल्ल पटेल भडकले
पवार कुटुंबातील कथित मतभेदांबाबत प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आक्रमक शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. 'शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषयच नाही, पार्थ विषय देखील काही मोठा नाही. अजित पवार आणि शरद पवारांबाबत जी चर्चा सुरू आहे ती फालतू आहे. हे प्रकरण मीडियाने मोठं केलं आहे,' असा आरोप पटेल यांनी केला आहे.
अजित पवार कुटुंबाची रात्रीच झाली बैठक?
पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी काल रात्रीच एक बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली आहे. यावेळी पार्थची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केल्याचं समजते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात काल रात्री झाली बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूंत्रांकडून मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.